हत्येचा कट रचणा-याला अटक करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:18 PM2018-11-28T22:18:49+5:302018-11-28T22:22:07+5:30
गुंडगिरीविरोधात आमदारांचे विधानसभेत भाष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरांची वाटचाल गुंडगिरीकडे सुरू असून असे सुरू राहिले तर कुणीही सुरक्षित राहणार नाही़ धुळयात आमदारांची पत्नी सुरक्षित नाही, आमदार स्वत: सुरक्षित नाही, काय चाललंय? असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी थेट विधानसभेत उपस्थित केला़ त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले़ तर दुसरीकडे आमदार समर्थकांनी धुळ्यात पोलीस अधीक्षकांची भेट घेतली़
आमदारांचे विधानसभेतील भाषण असे़
आम्ही गुन्हेगारीकरणाकडे चाललो आहोत, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे धुळे शहर आहे़ अध्यक्ष महाराज, जी ध्वनीफित आहे, त्या ध्वनिफितीमध्ये एक व्यक्ती दुसºया व्यक्तीला सांगतेय की, अवधानमध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या सभेत भाषण करत असतांना देशी कट्टयाने माझ्यावर रिव्हॉल्वर रोखलं आणि एका डॉक्टरने ते रिव्हॉल्वर हिसकावून घेतलं म्हणून मी आज या सभागृहात येऊ शकलो़ अध्यक्ष महोदय, मागच्या आठवड्यामध्ये माझ्या पत्नीबद्दल अतिशय अश्लाघ्य शब्दांमध्ये विनोद थोरात नावाच्या एका व्यक्तीने मजकूर टाकला़ मी तुम्हाला दाखवतो वाचण्यालायक नाही़ थोडक्यात कसं काय सांगू? मला बोलू द्या, खरं कळू द्या लोकांना, काय चाललंय ते़ अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये ५ आॅगस्ट २००२ ला जेव्हा छगन भुजबळ साहेबांनी गृहमंत्री असतांना माझं नाव घेतलं त्यावेळेला मी सांगितलं सगळयांच्या समोर, की माझ्या आत्मसन्मानाला कुणी तडा देत असेल तर मी सहन करणार नाही़ निष्कलंक चारित्र्य हे माझं राजकीय भांडवल आहे़ आणि त्याला जर धक्का लावाल तर याद राखून ठेवा हे ५ आॅगस्ट २००२ च्या प्रोसिडींगमध्ये आहे की नाही़ बघून घ्या़ अध्यक्ष महोदय कोण गुन्हेगार आहे ? २८ गुन्हेगार आहेत २८़ ज्यांच्यावर १०, १०-१५, १५ गुन्हे आहेत़ ३०२, ३०७, ३९५, ३५३़़ तुम्ही अशा लोकांना प्रतिष्ठा देणार आहात? आयुष्यभर लढतोय मी त्यांच्याविरूध्द आयुष्यभऱ अध्यक्ष महोदय, निवडणूका येतात-जातात, जय-पराभव ही काही गोष्ट नाही़ माझ्या आयुष्यात तर मला काहीच नाही़ पहिल्या विधानसभेत तर मला फक्त १८०० मते मिळाली होती, पण मी गुंडगिरीविरोधात लढलो, खंबीरपणे उभा राहिलो़ त्यावेळी विरोधकांचं सरकार होतं़ मी काय चुकीचं बोललो? काही असंसदीय शब्द वापरला? बाहेर घडलेल्या घटना या आमदारासंबंधी आहे़ बाहेर घडलेली घटना तिसºया माणसाबद्दल नाही या २८८ पैकी एकाबद्दल आहे़ तुम्ही असं जर कराल तर महाराष्ट्रामध्ये कुणी सुरक्षित राहू शकणार नाही़ आमदाराची पत्नी सुरक्षित नाही, आमदार स्वत: सुरक्षित नाही़ काय चाललंय? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे, चौकशी हे करू ते करू असे पोकळ आश्वासन देऊ नका़ मी २० वर्ष हेच ऐकतोय या सभागृहात, असे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत स्पष्ट केले़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले़
चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी़
माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांच्यासह लोकसंग्रामच्या पदाधिकाºयांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना निवेदन सादर केले़ २७ नोव्हेंबर रोजी व्हॉटसअप आणि सोशल मीडियावर आमदार अनिल गोटे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारी क्लिप व्हायरल होत होती़ या क्लिपमधील संभाषण मनपातील भाजपच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी यांचे पुत्र अमोल उर्फ दावू चौधरी यांची असून या क्लिपमध्ये गणेश नामक व्यक्तीशी संभाषण करताना आमदार अनिल गोटे यांच्या अवधान येथील झालेल्या प्रचार सभेत गावठी कट्याच्या सहाय्याने गोळ्या घालून भरसभेत हत्याकांड घडून आणणार होतो़ परंतु अज्ञात डॉक्टरने वेळीच अटकाव केल्याने आमदार गोटे यांच्या हत्येचा प्रयत्न फसला़ पुढे झालेल्या संभाषणानुसार ते केव्हाही आमदार गोटे यांची हत्या करु शकतात, असा इरादा दिसून येतो़ ही क्लिप सोशल मीडियावर फिरत असून त्याचे अवलोकन केल्यास पोलिसांना संपुर्ण प्रकार लक्षात येईल़ अमोल उर्फ दावू चौधरी तसेच आमदार गोटे यांची सुपारी देणारे कोण? या क्लिपमधील अज्ञात डॉक्टर कोण? संभाषणातील गणेश व्यक्ती कोण? त्याच्याजवळ शस्त्र आले कुठून? या बाबींची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली़ यावेळी हेमा गोटे, दिलीप साळुंखे, संजय बगदे, प्रा़ उषा पाटील, वंदना सुर्यवंशी, मेघना वाल्हे, अमोल सुर्यवंशी, प्रकाश जाधव, प्रशांत भदाणे, दीपक जाधव, कैलास शर्मा, भूषण पाटील, गोविंद वाघ, आनंदा पाटील, राजू कोठावदे उपस्थित होते़
आज मी जात्यात, बाकी सर्व सुपात- आमदार गोटे
हे माझं दुर्दैव-ही ध्वनिफित प्रसिध्द झाल्यानंतर ज्या माणसानी माझ्यावर रिव्हॉल्वर रोखलं होतं त्याने ज्याने मला ही ध्वनिफित माझ्याकडे पाठवली त्याला आज धमकी दिली़ आणि सांगितलं की त्या अमोल चौधरी जो भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा चौधरींचा मुलगा आहे मोठा़ त्याचं नाव कशासाठी घेतो तु? अध्यक्ष महोदय, मी या गुन्हेगारीकरणाविरूध्द गेली ३० वर्ष लढतोय़ ३० वर्ष़ याआधी कधी माझ्यावर असा प्रसंग आला नाही़ माझं दुर्दैव की माझंच सरकार आहे आणि माझ्यावर असा प्रसंग यावा़ पत्नीबद्दल अनुद्गार-अध्यक्ष महोदय, माझ्या पत्नीबद्दल असे अनुद्गार काढल्यानंतर, कोण आहे माझी पत्नी़़जनसंघाच्या महिला आघाडीची पहिली अध्यक्ष तिची आई होती नमुताई लिमये त्यांची मुलगी आहे़ ज्या दादा लोकांनी आपलं राहतं घर विकलं आणि जनसंघाला त्यांच्या स्मृतीमध्ये कार्यालय घेण्यासाठी पैसे दिले त्यांची ती भाची आहे़ कुणाला वाटत नाही इथे जनाची नाही तर मनाची तरी़ मी जनसंघाचा संघटनमंत्री होतो़ तर वाल्मिकी सापडतील कुठं?-अध्यक्ष महोदय, काय चाललंय? माझं एकच मतं़ आणि कोण आहे तो लिहिणारा? लिहिणारा १० नोव्हेंबरला आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे साहेब यांनी त्याचं त्यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करून त्याला पक्षात घेतलं तो आहे़ अध्यक्ष महाराज, हे बोलणं फार बरोबर आहे की आम्ही वाल्याचा वाल्मिकी करू़ अरे वाल्याच्या टोळयाच्या टोळया तुम्ही घेता वाल्मिकी सापडतील कुठं? मी जात्यात, बाकी सर्व सुपात- मी आज जात्यात आहे तर बाकी सर्व सुपात आहेत़ कुणाला वाटत असेल की अनिल गोटे दबून जाईल, पण परमेश्वर स्वत: खाली उतरला तरी मला वाकवू शकेल, अशी शक्ती या हिंदुस्तानात तयार होऊ शकत नाही, असे आमदार गोटे म्हणाले़ ‘हमसे जमाना है, जमाने से हम नही, हमको मिटा सके ये जमाने मे दम नही’ असा शेरही त्यांनी सादर केला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अनिल गोटेंनी मांडलेल्या मुद्याबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले़