आंतरजातीय विवाहाने लोकशाही जिवंत राहते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:10 PM2018-12-01T22:10:47+5:302018-12-01T22:11:20+5:30
उपायुक्त राजेंद्र जाधव : दिग्नाग फाऊंडेशन सामाजिक संस्थेतर्फे आंतरजातीय विवाहित जोडप्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आंतरजातीय विवाहामुळे समाजातील लोकशाही जिवंत राहते. लोक व्यापक विचार करतात. संकुचित विचार बाजूला पडतात. अंतरजातीय विवाह करण्याºया जोडप्यांनी आपल्या जीवनात आनंदी राहावे. आपल्या जीवनातून समाज समोर नवा आदर्श उभा करावा, असे मत उपायुक्त राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
दिग्नाग फाउंडेशन या संस्थेतर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार समारंभ व विशेषंकाचे प्रकाशन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वकील मधुकर भिसे, अॅड.विशाल साळवे, अॅड.विनोद बोरसे, प्रा.कमलेश बेडसे उपस्थित होते. समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी सांगितले की, समाजात परिवर्तन होण्यासाठी व जातींमधील तेढ व वाद मिटवण्यासाठी आणि सशक्त समाज निर्माण होण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे आवश्यक आहे. ज्येष्ठ वकील मधुकर भिसे म्हणाले की, आंतरजातीय विवाह देशाच्या हितासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. जातीव्यवस्था ही निसर्गत: नाही. ती मानवनिर्मित आहे. प्राण्यांमध्ये कोणतीही जाती व्यवस्था नाही. केवळ मनुष्य प्राण्यात जातीव्यवस्था दिसून येते. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणारे जोडपे खºया अर्थाने समाजपरिवर्तनाचे काम करीत आहेत, असे मत प्रा.कमलेश बेडसे यांनी मांडले. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी कार्य केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आज देखील जातीच्या नावाने आॅनर किलिंगसारख्या घटना घडत आहेत हे भयावह आहे. असे मतही बेडसे यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक राहुल जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन पगारे यांनी केले. आभार बिपिन मोरे, किशोर वाघ यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. आंतरजातीय विवाह आणि कायदा असा विषय घेऊन हा अंक काढण्यात आला आहे. या अंकात न्यायाधीश, ज्येष्ठ वकील आणि सामाजिक क्षेत्रातील अभ्यासकांचे लेख आहेत. कार्यक्रमाला तीस जोडप्यांनी उपस्थिती लावली होती.