धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 03:29 PM2018-12-01T15:29:46+5:302018-12-01T15:31:25+5:30
शासनविरोधी दिल्या घोषणा, जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
लोकमत आॅनलाइन
धुळे : जुनी पेंशन योजना लागू करावी, बीएलओंसह सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आज दुपारी क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असणाºया शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी अनेकदा निवेदन देवून प्रत्यक्ष भेटूनही प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात शासनस्तरावर कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. शासनाचा संबंधित विभाग चर्चा करण्याबाबतही उदासिन आहे.
शासनाचे शिक्षकांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ यावेळेत प्राथमिक शिक्षकांनी एकूण २४ मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. त्यात १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करवी, प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांना वंचीत ठेवू नये,३१ डिसेंबर २०१७पर्यंत एम.एस.सी.आय.टी. अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांना डिसेंबर २०१८पर्यंत मुदतवाढ मिळावी. कपात केल्या वेतनवाढी मागील लाभासह परत मिळाव्यात, कमी पटाच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीच शाळा बंद करू नये, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी शासनविरोधी घोषणाही देण्यात आल्या.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी, सुरेश पाटील, सुरेश सोनवणे,कैलास दाभाडे आंनद पाटील, प्रभाकर रायते, सुभाष पगार, गोकुळ सोनार, जितेंद्र राजपूत, मधुकर पाटील, भूपेश वाघ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यानंतर शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.