भोंदूगिरी करणाऱ्या बाबाला देवपूर पोलिसांनी पकडले; अनेक लोकांना होते गंडवले
By देवेंद्र पाठक | Published: August 20, 2023 07:53 PM2023-08-20T19:53:42+5:302023-08-20T19:54:00+5:30
दीड महिन्यापूर्वी जडे परिवाराला गंडविले होते, संशयित जामनेर तालुक्याचा
धुळे : घरात येऊन विश्वास संपादन करत दागिने लांबविणारा संशयित नारायण किसन चव्हाण (वय ३५, रा. ओझरखुर्द, ता. जामनेर, जि. जळगाव) याला बिलाडी रोड एकतानगर परिसरात दुचाकीसह रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेले दागिने देखील पोलिसांना काढून दिले. अशी माहिती देवपूर पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
किरण शेखर जडे (वय ४२, रा. नेहरू हाउसिंग सोसायटी, देवपूर धुळे) या महिलेने देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घरात आलेल्या अनोळखी व्यक्तीने साधूचा वेश परिधान करून महिलेसह तिच्या पतीचा विश्वास संपादन केला. मंत्रोच्चार करत पैसे नाही तर दागिने ठेवा. सायंकाळी पुन्हा जेवणासाठी येण्याचे सांगत १८ हजारांचे दागिने लांबविले. ही घटना २९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता देवपुरातील नेहरू हाउसिंग सोसायटीत घडली. भोंदूबाबाने ६ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातले काप, १२ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा १८ हजार रुपये किमतीचा ऐवज जडे परिवाराकडून मिळविला. त्या अनोळखी व्यक्तीने जडे परिवारासमोर काही मंत्रोच्चार केला.
थोड्या वेळाने त्याने दागिने घेऊन जातो आणि सायंकाळी पुन्हा आपले दागिने परत करतो, त्यानंतर तुमच्यासोबत जेवण करतो असे सांगत दोघांचा विश्वास संपादन केला. या दोघांनीही त्याला दागिने देऊन टाकले. सायंकाळपर्यंत त्याची वाट पाहण्यात आली. दीड महिना उलटूनही तो आलाच नाही. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच जडे परिवाराने देवपूर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता फ्सवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सीसीटीव्ही कॅमेरा आणि सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी शोधकार्य सुरु केले. एकतानगर भागातून त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर व त्यांच्या पथकातील राजेश इंदवे, मिलिंद सोनवणे, पंकज चव्हाण, किरण साळवे, सागर थाटशिंगारे, साैरभ कुटे, विश्वनाथ शिरसाठ यांनी केली.