शिधा मिळविण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:59 PM2019-02-13T23:59:15+5:302019-02-13T23:59:57+5:30
मालपूर : ई-पॉस मशिनमध्ये अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याने लाभार्थी लाभापासून वंचित
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशिनवर लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. कधी कनेक्टीव्हिटी नसल्याने तर कधी बोटाचे ठसे जुळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत असल्यामुळे लाभार्थी अक्षरश: त्रस्त झाले आहेत.
शासन, प्रशासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरणाची प्रणाली ई-पॉस मशिनने सुरु केली आहे. मालपूर येथे एकूण तीन स्वस्त धान्य दुकाने असून येथे ई-पॉस मशिनने लाभार्थ्यांना गोंधळात टाकले आहे. या महिन्यात ठसा जुळला, मात्र, पुढील महिन्यात ठसा जुळेलच याची शाश्वती नसल्याने शिधापत्रिकाधारक हैराण झाले आहेत. ई-पॉस मशिनला कधी कनेक्टिव्हिटी मिळत नाही तर कधी लवकर चार्जींग संपते. यासोबतच शिधापत्रिकाधारकांचे ठसे येत नसल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक महिन्याला आधारकार्ड नंबर अपडेट करण्यासाठी व हाताच्या ठशाचे नमुने जुळवून घेण्यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा पुन्हा आधार सेवा केंद्रावर जावे लागत आहे.
एपीएल, बीपीएल आणि अंत्योदय प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानामार्फत प्रणालीनुसार धान्य पुरवठा करण्यात येत असतो. या धान्य पुरवठा प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी पुरवठा विभागाने ई-पॉस मशिनवर कुटुंब प्रमुखासह घरातील सदस्यांचे आधारकार्ड व अंगठ्याचे ठसे घेऊन फेरतपासणी प्रक्रिया सध्या दुकानांवर राबविण्यात येत आहे.
तसेच धान्य घेण्यासाठी येणारे कुटुंब प्रमुख व अन्य सदस्यांच्या अंगठ्याचे ठसे घ्यावेत व जुळत नसतील तर मालाचे वितरण करु नये, असे पुरवठा विभागाचे आदेश असल्यामुळे येथील अनेक लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मध्यंतरी लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देत समस्या सोडविण्याची प्रशासनाला विनंती केली. मात्र, यानंतरही समस्या न सुटल्याने शिधापत्रिकाधारक हैराण झाले आहेत.
तालुका, जिल्हा दक्षता समितीने लाभार्थ्यांच्या समस्येची दखल घ्यावी. अन्यथा स्वस्त धान्य दुकानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा येथील शिधापत्रिका धारकांनी दिला आहे.