सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना

By भुषण चिंचोरे | Published: March 31, 2023 05:16 PM2023-03-31T17:16:44+5:302023-03-31T17:17:38+5:30

हातात भगवा ध्वज घेत, भक्तिगीतांवर थिरकणाऱ्या तरुणांचा समावेश असलेल्या पन्नासपेक्षा अधिक वारींचे शहरात शुक्रवारी आगमन झाले.

Devotees leave for darshan of Saptshringi Mata | सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना

सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना

googlenewsNext

धुळे : वणी येथील आदिशक्ती सप्तशृंगी माता खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चैत्र पौर्णिमेला वणी गडावर भरणाऱ्या यात्रोत्सवासाठी व देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक पायी जातात चैत्र पौर्णिमा काही दिवसांवर आल्याने पायी जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे. शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात आले. खान्देशातील शिरपूर, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, शहादा, दोंडाईचा या ठिकाणाहून दरवर्षी वणी गडावर जाण्यासाठी पायी वारी काढल्या जातात. या वाऱ्यांमध्ये हजारो भाविक सहभागी होतात, यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असतो.

मागील काही वर्षांपासून महिलांचा सहभागही वाढला आहे. हातात भगवा ध्वज घेत, भक्तिगीतांवर थिरकणाऱ्या तरुणांचा समावेश असलेल्या पन्नासपेक्षा अधिक वारींचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. शहरातील विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळे, राजकीय पक्ष व संघटना यांनी त्यांचे स्वागत केले. वारीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे यांच्याकडून भाविकांना दरवर्षी जेवण दिले जाते. यंदाही त्यांनी ती परंपरा कायम ठेवली असून गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी २४ तास जेेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नवस फेडण्यासाठी गर्दी : सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाणारे भाविक नवस बाेलून दाखवतात व पुढच्या वर्षी नवस फेडतात. नवस फेडण्यासाठी गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या एका दाम्पत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हे दाम्पत्य आपल्या तान्हुल्या लेकराला झोळीत घेऊन नवस फेडण्यासाठी गडावर निघाले आहे.

दुपारी विश्रांती मग मजल - दरमजल 

चैत्राचे कडक उन्ह पडत असल्याने गडावर जाणारे भाविक सकाळी व सायंकाळी अधिक चालतात. पहाटे झुंजूमुंजू झाल्यानंतर भाविक चालायला सुरुवात करतात. वाटेत पाणी इतर खाद्य पदार्थांचे वाटप केले जाते. दुपारी विश्रांती केल्यानंतर पुन्हा मजल - दरमजल प्रवास सुरू होतो. चैत्र पौर्णिमेच्या आधी गडावर पाहोचून सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचे नियोजन भाविकांनी केले आहे.

ढोल- ताशांसह डीजेचीही सोबत
भाविकांच्या जथ्यासोबत ढोल- ताशांसह डीजेही आहेत. डीजेवर सुरू असलेल्या भक्तिगीतांवर थिरकत भाविक दररोज २० ते २५ किलोमीटरचे अंतर कापत आहेत.

 

Web Title: Devotees leave for darshan of Saptshringi Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे