रूप पाहोनी गजाननाचे भक्तगण प्रसन्न झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:36 PM2018-02-07T22:36:51+5:302018-02-07T22:40:05+5:30
धुळे येथे ‘गण गण गणात बोते’ चा गजर, दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; भजनांनी रंगला प्रकट दिनाचा सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बुधवारी वाडीभोकर रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याने दुपारपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले होते. श्री सद्गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी पहाटे पाच वाजता ‘श्रीं’ च्या मूर्तीस अभिषेक, पूजन करण्यात आले. साडेअकरा वाजता धर्मदाय आयुक्त वर्षा मिश्रा, राम लिप्ते यांच्याहस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, मंडळाचे अध्यक्ष गोपाळ केले व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. मंदिराच्या प्रांगणात सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हापासून संरक्षणासाठी प्रांगणात भव्य मंडप टाकण्यात आलेला होता. दर्शनासाठी महिला व पुरूष यांच्याकरीता बॅरिकेट्स लावून स्वतंत्र व्यवस्था केलीली होती. मंदिराच्या प्रांगणात विविध महिला भजनी मंडळांकडून भजने सादर करण्यात येत होती. यानिमित्ताने मंदिरात आंब्याच्या पानांचे मंगल तोरण व झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. तसेच मंदिराच्या बाहेर व आत काढण्यात आलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. प्रकट दिनानिमित्त होणाºया विविध कार्यक्रमांसाठी अपूर्व उत्साह पहावयास मिळाला. पहाटेपासून महिलांनी सडासंमार्जन करून अंगणात आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या. विविध परिसरातील महिला भजनी मंडळांचा उत्साहसुद्धा वाखाणण्याजोगा होता. मंदिराच्या बाहेरील ओट्यावर सकाळी ९ वाजेपासून जिल्ह्यातील विविध महिला भजनी मंडळांच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ, श्री मुक्ताई भजनी मंडळ, श्री तुळजाभवानी भजनी मंडळ (गोराणे, ता. शिंदखेडा) व श्री एकता भजनी मंडळाच्या महिलांनी सहभाग घेतला होता. संध्याकाळी ६ वाजता चित्रकुट संस्थानचे मंगलनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. यासह दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी मंदिरात दिसून आली. प्रकट दिन सोहळ्यासाठी शहरातील सर्व भागातून मंदिराकडे जाणाºया भाविकांमुळे संपूर्ण वाडीभोकर रस्ता परिसरात चैतन्याचे वातावरण पसरल्याचे दिसत होते. संध्याकाळी उशीरापर्यंत हा सिलसिला सुरू होता.