धनदाई व पेडकाई देवी यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:07 PM2019-04-12T17:07:30+5:302019-04-12T17:08:13+5:30
जय्यत तयारी : विविध धार्मिक कार्यक्रम; तरुण ऐक्य मंडळ व मंदिर ट्रस्टतर्फे पूर्ण नियोजन
म्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी येथील कुलस्वामिनी धनदाई मातेचा यात्राउत्सव चैत्र शुद्ध अष्टमी शनिवार १३ एप्रिल पासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळ म्हसदी व ग्रामपंचायत म्हसदी यांच्या संयुक्तपणे नियोजन व आयोजनाबाबत नुकतीच बैठक झाली. यात्रा उत्सव काळात विविध बाबींवर समर्पकपणे चर्चा करण्यात आली व नियोजन करण्यात आले.
श्री धनदाई देवी अनेक कुळांची कुलदैवत असल्यामुळे अनेक भाविक नवस करत असतात. मुलांचे जावळाच्या नवसपूर्तीसाठी अनेक भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाच्या पर्यटन विकास विभागाच्यावतीने दीड कोटी निधीतून भव्य सभागृह साकारले जात आहे. याद्वारे नवस फेडणे, जावळाची जागा आदी बाबत व्यवस्था व नियोजन मंडळ व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
या यात्रेसाठी विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात. याच काळात उन्हाची तीव्रता लक्षता घेवून मंडळ व ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पाण्याची व्यवस्था केली आहे. भाविकांना कार्यक्रमासाठी देखील पाणी उपलब्ध होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने दहा रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी उपलब्ध असेल शिवाय एक रुपयाचे नाणे टाकल्यावर ‘एटीएम’ पद्धतीने एक लिटर थंड पाणीही मिळेल. याव्यतिरिक्त म्हसदी येथील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्तींकडून टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे.
यात्रा काळात कोणताही कर नाही
यात्रेमध्ये अनेक प्रकारचे विविध व्यावसायिक विक्रीसाठी येत असतात. त्यांना जागा उपलब्ध करून देणेबाबत व्यवस्था करण्यात आलेली आहे. या यात्रा काळामध्ये ग्रामपंचायतीद्वारे कोणत्याही यात्रा कर, बाजार कर आकारण्यात येणार नाही, असे ग्रामपंचायतीने सांगितले आहे.
श्री धनदाई देवी यात्रा निमित्ताने १४ एप्रिल रोजी कुस्तीच्या दंगलीचे आयोजन सकाळ व दुपार सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. दंगलीत खान्देशातील नामंकित मल्ल सहभागी होतात.
कुस्तीसाठी मंडळाच्या वतीने मोठी रक्कम व भांडी तसेच सामाजिक कार्यकर्ते व कुस्ती प्रेमींनी देखील बक्षीस उपलब्ध करून दिलेले आहे. यात्रा काळामध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये, कार्यक्रमासाठी गैरसोय होऊ नये व दर्शन सुलभ व्हावे या उद्देशाने मंडळ व ग्रामविकास मंडळ आणि गावातील तरुण स्वयंसेवकांची भूमिका पार पाडणार आहेत.
धनदाई देवी दर्शनाची व्यवस्था
मातेच्या दर्शनासाठी भाविक विविध भागातून आपल्या कुटुंबासह येत असतात. भाविकांच्या देणगीतून मंडळाने सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. यात मोफत भक्तनिवास, भाविकांना नवसपूतीर्साठी स्वतंत्र पत्र्याचा शेड उभारला आहे. त्यांना दर्शन कमी वेळात व चांगल्याप्रकारे होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता देखील मंडळाच्या वतीने घेण्यात येणार आहे.
यात्रा कारणांमध्ये आलेल्या सर्व भाविक विक्रेत्यांना कोणताही उपद्रव होणार नाही याची दक्षता घेत काळजी घेण्याचे आवाहन धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष हिम्मतराव दयाराम देवरे, सेक्रेटरी सुभाष गजमल देवरे यांच्यासह संचालक मंडळाने केलेले आहे. सरपंच दीपक शैषमल जैन व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
काटवान भागातील प्रख्यात असलेल्या यात्रा व इतर कार्यक्रमांमध्ये कोणतीही बाधा येऊ नये व यात्रा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाद्वारे विशेष बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यात्रा काळात सर्वांनी शांतता राखावी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आलेले आहे.