धर्मा पाटील यांच्या मुलाला ४८ लाखाचे सानुग्रह अनुदान अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:06 PM2018-02-27T12:06:15+5:302018-02-27T12:15:46+5:30
‘महाजनको’ने केले वर्ग : विश्वासात न घेता केले फेरमूल्यांकन; ३ मार्चनंतर भूमिका स्पष्ट करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने २२ जानेवारीला मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यानंतर शासनाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने त्यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन केले. त्यानुसार धर्मा पाटील व त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्या बॅँक खात्यात ‘महाजनको’ ने ४८ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा केले. परंतु, हे सानुग्रह अनुदान अमान्य आहे. प्रशासनाने आम्हांला विश्वासात न घेता जमिनीचे फेरमूल्यांकन केले. त्यामुळे ३ मार्चपर्यंत मी आणखी वाढीव मोबदल्याची वाट पाहणार आहे. शासनाने आम्हांला न्याय न दिल्यास ३ मार्चनंतर माझी भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती नरेंद्र धर्मा पाटील यांनी मंगळवारी सकाळी ‘लोकमत’ शी बोलताना दिली आहे.
धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर नरेंद्र पाटील यांनी त्यांचे पार्थिव उचलणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या शासानाने मंत्रालयस्तरावर बैठक घेतली. बैठकीत जिल्हा प्रशासनाला जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश दिले. तसेच नरेंद्र पाटील यांना ३० दिवसात न्यायदान केले जाईल, असे हमीपत्र ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहून दिले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांना राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही विश्वासात घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासित केले होते. नरेंद्र पाटील यांना दिलेल्या ३० दिवसाची मुदत ३ मार्चला संपुष्टात येत आहे.
धर्मा पाटील यांच्या जमिनीचे ५४ लाखाचे मूल्यांकन
शासनाने धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकनाचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर फेरमूल्यांकन झाल्यानंतर प्रशासनाने शासनाकडे पाठविलेल्या अहवालात धर्मा मंगा पाटील यांच्या गट क्रमांक २९१/२ अ मध्ये रोपांची परिगणित किंमत १, ७०, ७०१ अशी ठरविली आहे. त्यासाठी एकूण देय रक्कम २८ लाख ५ हजार ९८४ ठरविण्यात आली आहे. तर धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्या २९१/२ ब या क्षेत्रात रोपांची परिगणित किंमत १ लाख २३ हजार ४८८ दाखविण्यात आली आहे. त्यासाठी एकूण देय रक्कम २६ लाख ४२ हजार १४८ येवढी रक्कम अहवालात नमूद करण्यात आली होती. त्यामुळे धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना ५४ लाख ४८ हजार १३२ इतकी रक्कम मिळणार होती. प्राप्त माहितीनुसार पाटील कुटुंबीयांना यापूर्वी काही रक्कम दिल्यामुळे ती रक्कम वजा करून ‘महाजनको’ ने ४८ लाख रुपये वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फेरमूल्यांकन करताना विश्वासात घेतले नाही
शासनाने जिल्हा प्रशासनाला फेरमूल्यांकनाचे आदेश दिले. त्यानंतर फेरमूल्यांकन कधी झाले? याची माहितीही आम्हांला नाही. फेरमूल्यांकन करताना आम्हांला विश्वासातही घेण्यात आलेले नाही. त्यामुळे ४८ लाख रुपये ‘महाजनको’ ने वर्ग कसे केले? याची माहिती देणे आवश्यक आहे. आमच्या शेतात २०११ ते २०१७ याकालावधित असलेल्या फळझाडांविषयी पुरावे आम्ही शासनाला दिले आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर आम्हांला न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, ४८ लाख रुपये शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून आम्हांला दिले आहे, ते आम्हांला अपेक्षित नाही. आमची पूर्वीपासून जी मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम राहणार असून आम्हांला दिलेल्या आश्वासनानुसार ३ मार्चपर्यंत आम्ही वाढीव मोबदल्याची वाट पाहणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका जाहीर करू, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
‘महाजनको’ माझ्या व वडीलांच्या बॅँक खात्यात ४८ लाख रुपये जमा केल्याचे मी मंगळवारी सकाळी पाहिले. परंतु, हे सानुग्रह अनुदान आम्ही स्वीकारणार नाही. आमची मूळ मागणी पूर्वीपासून एकच आहे. जो मोबदला आमच्या बाजूच्या शेतकºयाला मिळाला. त्याच प्रकारे आम्हांला मोबदला मिळायला पाहिजे.आम्ही अजून वाट पाहणार आहोत. अन्यथा ३ मार्च रोजी आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू.
- नरेंद्र पाटील, (धर्मा पाटील यांचा लहान मुलगा)