धुळे जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:53 AM2020-01-22T11:53:23+5:302020-01-22T11:53:45+5:30
प्रशासनातर्फे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
धुळे जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५६ आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक म्हणजे ३९ जागा जिंकून प्रथमच जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळविली आहे.
निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड झाली. अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने, या पदासाठीही बरीच चुरस होती. मात्र यावेळी प्रथमच भाजपने शिरपूर तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १४ जागांवर विजय मिळविल्याने, अध्यक्षपदी शिरपूर तालुक्यातील विखरण गटातून निवडून आलेले डॉ. तुषार रंधे यांची निवड झालेली आहे.
दरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर आता विषय समिती सभापतीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
सभापतीपदावर आपली वर्णी लागावी यासाठी काहींनी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरूवात केलेली आहे.
दरम्यान अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या कुसुमबाई निकम यांना उपाध्यक्षपद मिळालेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अर्थ व बांधकाम समिती सभापतीपद असणार आहे.
दरम्यान धुळे तालुक्यातूनही जिल्हा परिषदेच्या १५ पैकी १० जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे या तालुक्यालाही किमान दोन सभापतीपद मिळू शकतात. त्यात महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद धुळे तालुक्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे. साक्री तालुक्यालाही एक सभापतीपद मिळू शकते.दरम्यान आतापर्यंत सर्व समितींवर कॉँग्रेसचे वर्चस्व असायचे आता या समिती भाजपच्या ताब्यात जाणार आहेत.
ॅनिवड बिनविरोध होणार?
दरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होऊ शकली नव्हती. मात्र आता जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असल्याने, सभापतींची निवड बिनविरोध होणार की त्यासाठीही निवडणूकच घेण्यात येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.