धुळे शहर हगणदरीमुक्त घोषित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 06:29 PM2017-07-25T18:29:02+5:302017-07-26T18:57:34+5:30
शासनाने हगणदरीमुक्त शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यात राज्यातील चार महापालिकांसह धुळे शहराला हगणदरीमुक्त घोषित केले आहे.
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.25 - शहर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवडय़ात केंद्रीय समिती शहरात दाखल झाली होती़ या समितीने दिलेल्या अहवालानंतर शासनाने हगणदरीमुक्त शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यात राज्यातील चार महापालिकांसह धुळे शहराला हगणदरीमुक्त घोषित केले आहे.
स्वच्छतेत यापूर्वीही गौरव
स्वच्छ भारत सव्रेक्षणांतर्गत शहरातील स्वच्छतेची पाहणी यापूर्वीही केंद्र व राज्य सरकारने केली होती़ त्यात केंद्र शासनाने धुळे महापालिकेला देशात 123 वा क्रमांक मिळाला होता. तर राज्यात महापालिकेने स्वच्छतेत दहावे स्थान मिळविले होत़े त्यानिमित्त मनपाच्या तत्कालिन आयुक्त संगीता धायगुडे यांचा सत्कारही करण्यात आला होता़
केंद्रीय समितीकडून पाहणी
गेल्या आठवडय़ात शुक्रवारी 21 जुलैला केंद्रीय समिती तज्ज्ञ मयूर उदारे यांनी धुळे शहरातील स्वच्छतेची पाहणी केली होती़ त्यांनी भीमनगर, यशवंत नगर, स्वीपर कॉलनी, लक्ष्मीवाडी, एसआरपी कॉलनी, कुमार नगर, पाचकंदील मार्केट परिसर, धुळे महापालिका शाळा क्रमांक 47, धुळे महापालिका शाळा क्रमांक 56 आणि पांझरा नदीपात्र परिसराची समितीने पाहणी केली होती़ त्यावेळी मनपाचे सहायक आयुक्त शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसिअर चंद्रकांत उगले उपस्थित होते. त्याचप्रमाणे केंद्रीय समितीचे तज्ज्ञ मयुर उदारे यांनी कागदपत्रांची देखील तपासणी केली होती़ या तपासणीअंती केंद्र शासनातर्फे धुळे शहर व महापालिका क्षेत्र हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले आह़े त्याबाबत तपासणी अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आह़े
प्रशासनाचे अभिनंदन
महापौर कल्पना महाले यांनी या यशाबद्दल आयुक्त सुधाकर देशमुख व सर्व वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला़ शहर स्वच्छतेतील योगदानाबद्दल हा सत्कार करण्यात आला़