विठू नामाच्या गजरात दुमदुमणार धुळेनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:33 AM2019-07-12T11:33:55+5:302019-07-12T11:34:12+5:30
मालेगाव रोडवर असलेले विठ्ठल मंदिर. या मंदिरात आषाढी एकादशीला सकाळपासून गर्दी होत असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आषाढी एकादशीनिमित्ताने शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी विठू नामाच्या गजराने अवघी धुळे नगरी दुमदुमणार आहे. आषाढीनिमित्त मंदिरांमधील तयारी अंतिम टप्यात आलेली आहे.
शहरातील मालेगाव रोडवरील दसेरा मैदानाजवळ जुन्या काळातील विठ्ठलाचे मंदिर आहे़ त्र्यंबक गणेश गानू यांनी १९६६ साली हे मंदिर बांधले आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडात करण्यात आलेले आहे. मंदिरातील मूर्तीही येथेच घडविण्यात आलेल्या आहेत.
मंदिरात विठ्ठलाची साडेतीन फुटाची काळ्या पाषाणाची मूर्ती असून, ही मूर्ती मुंबईचे शिल्पकार शिरवाळकर बंधूंनी घडविली आहे. मंदिरात मूर्तीच्या बाजुला मारूती व गरूडाची पाषाणातील मूर्ती आहे. या मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात़ त्यामुळे मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते़
सकाळी ५ वाजता महापूजा
आषाढी एकादशीला सकाळी ५ वाजता गानू परिवारातील सदस्यांच्याहस्ते श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. त्यानंतर भाविक दर्शन घेत असतात.
महिला व पुरूष भाविकांना श्रीविठ्ठलाचे दर्शन घेता यावे म्हणून बॅरिकेटस लावण्यात आलेले आहेत. तसेच या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त राहील.
विक्रेत्यांनी थाटली दुकाने; पाळणेही दाखल
४मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. गुरूवारी दुपारपासून शहरातील काही भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल होत होते. दरवर्षी येथील मंदिर परिसरात छोटेखानी यात्रा भरत असते.
४ ग्रामीण भागातील अनेक भाविक दर्शनासाठी येथील मंदिरात येत असतात. तर काही भाविक पदयात्रा करत येथे येतात.