धुळ्यात धूमस्टाईलने मोबाईल चोरणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:50 PM2018-04-11T12:50:25+5:302018-04-11T12:50:25+5:30
२१ अॅन्ड्राईड मोबाईल व दोन दुचाकी जप्त: आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
आॅनलाइन लोकमत
धुळे : धूमस्टाईलने मोबाईल चोरणाºया चौघांना देवपूर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी अटक केली आहे. त्यांच्याजवळून २१ अॅन्ड्राईड मोबाईल, दोन दुचाकी असा एकूण ३ लाख ५५ हजाराचा ऐवज जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी आज देवपूर पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या काही दिवसात देवपूर भागातून रात्रीच्यावेळी धूमस्टाईलने मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. तसेच ६ एप्रिल १८ रोजी रात्री १० वाजता लक्ष्मीनगर देवपूर धुळे येथे कल्पेश ठाकूर हे कॉलनी परिसरात अंगणात मोबाईलवर बोलत असतांना दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी मध्ये बसलेल्या एकाने ठाकूर यांच्या हातातील ४० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला होता. याप्रकरणी ९ रोजी देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धूमस्टाईलने मोबाईल चोरीच्या घडलेल्या घटना लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी देवपूर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला या प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पथकाने सापळा रचून अक्षय सुरेश चव्हाण (वय १९, रा. दैठणकरनगर, वाडीभोकर रोड धुळे), दिनेश उत्तम मोहिते (२०, रा. इंदिरानगर, देवपूर धुळे), सुरज बबन ठाकरे (२०, रा. उमाबाई शाळेजवळ, देवपूर धुळे) यांच्यासह एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींजवळून विविध कंपन्यांचे २१ अॅन्ड्राईड स्क्रीनटच मोबाईल, दोन दुचाकी असा एकूण ३ लाख ५५ हजार रूपयांचा माल जप्त केला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक अकबर पटेल, उपनिरीक्षक चंद्रकांत चातुरे, हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, कैलाप पाटील, चंद्रशेखर नागरे, के. एम. पाटील, कॉन्स्टेबल कबीर शेख, संदीप अहिरे, विनोद अखडमल, प्रवीण थोरात, नरेंद्र शिंदे, शिरीष भामरे यांच्या पथकाने केली.
या पथकाचे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी कौतुक केले आहे.