धुळ्यातील गॅस गळतीत भाजलेल्या तरुणाचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 07:03 PM2019-05-09T19:03:23+5:302019-05-09T19:04:09+5:30
शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : अन्य जखमींवर उपचार सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शेजारधर्म पाळण्यासाठी मदत करण्याकरीता गेलेले सुधाकर जोशी हे देवपुरातील गॅस गळतीच्या दुर्घटनेत गंभीररित्या भाजले गेले होते़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी निधन झाले़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली़ दरम्यान, घटनेतील अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत़
देवपुरातील एकवीरा देवी मंदिर परिसरात असलेल्या गल्ली नंबर ७ मध्ये राहणारे प्रमोद लालचंद भोई यांच्या घरात गॅस सिलेंडर लावताना गॅसला गळती लागली होती़ गॅस बाहेर पडताना होणाºया आवाजाने घरातील सदस्य घाबरले़ त्यानंतर घराबाहेर पडले होते़ शेजाºयांची मदत यावेळी घेण्यात आली होती़ घटनेचे गांभिर्य पाहून अनेक जणांनी घटनास्थळी धाव घेतल्याने गर्दी जमा झाली़ भोई यांच्या घराशेजारी राहणारे सुधाकर ज्ञानेश्वर जोशी उर्फ बंडू जोशी हे सिलेंडरचे नॉब बंद करण्याचा प्रयत्न करत असतानाच घरात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या गॅसने पेट घेतला़ त्यात मदतीसाठी आलेल्या सुधाकर जोशींसह घरातील निर्मलबाई लालचंद भोई, अक्षय लालचंद भोई, दिपा लालचंद भोई असे चौघे जण भाजले गेले होते़ त्याचवेळेस घरात दिवा सुरु असल्याने गॅसने पेट घेतल्याची दुर्घटना घडली होती़ या दुर्घटनेत भाजले गेलेल्या चौघांना तातडीने खासगी वाहनाने सुदाम परशुराम भोई यांनी तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते़ या आगीत निर्मलाबाई लालचंद भोई या ७४ टक्के, अक्षय भोई हा १८ टक्के, दिपा भोई या ९ टक्के तर मदतीसाठी आलेले सुधाकर जोशी हे सर्वाधिक ९८ टक्के भाजले गेले होते़ रुग्णालयात उपचार सुरु असताना सुधाकर जोशी यांचे बुधवारी सकाळी निधन झाले़ यानंतर सुधाकर यांच्या पार्थिवावर साश्रृनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले़