धुळे : शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले
By अतुल जोशी | Published: September 7, 2022 05:40 PM2022-09-07T17:40:01+5:302022-09-07T17:40:29+5:30
तालुक्यातील बोराडी ते वाडी गावादरम्यान असलेल्या नांदर्डे गावाजवळ घाट उतरत असताना हा अपघात झाला.
शिरपूर (जि.धुळे) : शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात चार मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील बोराडी ते वाडी गावादरम्यान असलेल्या नांदर्डे गावाजवळ घाट उतरत असताना हा अपघात झाला. गाडीमधील मजुरांनी तात्काळ १०८ क्रमांकाला संपर्क साधून मोठा अपघात झाल्याचे सांगून रूग्णवाहिकेची मागणी केली. त्यामुळे काही वेळातच तब्बल ४ रूग्णवाहिका दाखल झाल्या. जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
बुडकी गावाकडून मजूर घेऊन जाणारी चारचाकी (एमएच २१-सी-३०८९) ही शिरपूरकडे येण्यासाठी निघाली होती. बोराडी घाट उतरून गाडी भरधाव वेगाने येत असतांना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या झाडाझुडपात जाऊन उलटली. त्यात अपघात गाडीतील सर्व मजूर इतरत्र फेकले गेले.
अपघातातील जखमींना नगरपालिकेच्या इंदिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ जणांना उपचार करून सोडण्यात आले तर एका युवतीची तब्बेत गंभीर असल्यामुळे तिला तातडीने धुळे येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आहे. या अपघातप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा सायंकाळी उशिरापर्यंत दाखल झालेला नव्हता.