धुळे : गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार, मारहाण; तरुणांविरोधात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: March 28, 2023 04:34 PM2023-03-28T16:34:09+5:302023-03-28T16:34:31+5:30
शिरपूरसह बोईसर येथील घटना
धुळे : महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीवर थंडपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिने विरोध केला असता, तिला मारहाण करण्यात आली. ही घटना शिरपूर अणि बोईसर येथे घडली.
स्वत:ला सावरत पीडित तरुणीने शिरपूर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार जळगाव येथील एका तरुणाने नोव्हेंबर २०१९ पासून वेळोवेळी थंडपेयामध्ये काहीतरी गुंगीकारक औषध टाकून तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ केली. तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिचे नग्नावस्थेत फोटोही काढले. काढण्यात आलेले फोटो आणि सेक्स चॅटचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार शिरपूर आणि बोईसर येथे घडला.
एवढेच नाहीतर पीडित तरुणीच्या भावासह तिच्या आईला देखील त्याने शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार जळगाव येथील एका तरुणाविरोधात अत्याचारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक कुटे घटनेचा तपास करीत आहेत.