‘स्वच्छता जनाग्रह’ अॅपवर धुळेकर नागरिकांतर्फे तक्रारींचा भडीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:13 PM2017-11-24T22:13:04+5:302017-11-24T22:15:37+5:30
१ हजार नागरिकांनी केले अॅप डाऊनलोड : तक्रार प्राप्त झाल्यानंतर २४ तासात निकाली; आतापर्यंत तीन हजार तक्रारींचा निपटारा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपा प्रशासनाने स्वच्छ व सुंदर धुळे शहरासाठी नागरिकांना ‘स्वच्छता जनाग्रह अॅप’ च्या माध्यमातून तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले होते. त्याला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या माध्यमातून आतापर्यंत तीन हजार तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. दररोज १०० हून अधिक अस्वच्छतेच्या तक्रारी या अॅपद्वारे प्राप्त होत आहेत. तक्रारी प्राप्त होताच पुढील २४ तासात नागरिकांच्या तक्रारी मार्गी लावल्या जात असल्याची माहिती मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा स्व्चछ सर्वेक्षणचे नोडल अधिकारी अनूप दुरे यांनी दिली आहे.
तक्रारी मार्गी लावण्यासाठी २४ तासाचा कालावधी
‘स्वच्छता जनाग्रह अॅप’ विकसित झाल्यानंतर या माध्यमातून १२ तासात तक्रारी निकाली काढव्यात, असे निर्देश होते. मात्र, मोठ्या शहरातील महानगरपालिकांनी शासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या मार्गी लावण्यासाठी १२ तासाचा अवधी हा कमी पडत असून त्यासाठी २४ तास करावा, अशी मागणी केली होती. त्याला शासनाने ‘हिरवा कंदील’ दाखविला. त्यामुळे मनपा कर्मचाºयांना अस्वच्छतेच्या तक्रारी प्राप्त झाल्यापासून त्या २४ तासाच्या आत निकाली काढणे बंधनकारक आहे.
१० स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी
अॅपद्वारे शहरातील अस्वच्छतेबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती निकाली काढण्यासाठी १० स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षक सफाई कर्मचाºयांच्या मदतीने शहरात अस्वच्छता राहणार नाही, याची काळजी घेतील, असे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहे. हे काम प्रामाणिकपणे करणाºया कर्मचाºयांच्या सेवा पुस्तिकेतही तशी नोंद घेतली जाणार आहे. चांगले करणाºया कर्मचाºयाचा सत्कारही केला जाईल. तक्रार प्राप्त होऊनदेखील स्वच्छता निरीक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे मनपातर्फे सांगण्यात आले. स्वच्छता अॅपच्या माध्यमातून नागरिकांना १३ प्रकारच्या तक्रारी करता येणार आहेत. त्यात खुल्या भूखंडावर पडलेला कचरा, गटारी तुंबलेल्या, मेलेली जनावरे, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, शौचालयातील लाईट बंद असणे, घराचा परिसर अस्वच्छ, ओला व सुका कचरा यासंदर्भातील तक्रारींचा समावेश आहे.
अस्वच्छतेसंदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारी २४ तासात मार्गी लावल्या जात आहेत. शहरातील पेट्रोलपंप चालकांनायापूर्वी पत्राद्वारे पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृह नागरिकांसाठी मोफत खुले ठेवावे, असे आदेश दिले आहे. हे तपासण्यासाठी शहरात सर्वेक्षण केले जाणार असून स्वच्छतागृह खुले केले नसतील, तर पेट्रोल पंपचालकांवर कारवाई केली जाईल. - अनूप दुरे, सहाय्यक आयुक्त, मनपा