धुळे : मुलींकडे बघून ओरडू नका म्हणताच लोखंडी रॉडने मारहाण
By देवेंद्र पाठक | Published: March 28, 2023 04:44 PM2023-03-28T16:44:40+5:302023-03-28T16:45:11+5:30
तालुक्यातील अजंग येथील घटना, तिघांवर गुन्हा
धुळे : हळदीच्या कार्यक्रमात मुलींकडे पाहून आरोळा मारणे, जोरजोरात शिट्या मारण्याचे प्रकार करू नका, असे सांगणाऱ्या एकाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री धुळे तालुक्यातील अजंग गावात घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नवरा, बायको आणि मुलगा अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे तालुक्यातील अजंग येथील आनंदा पुंडलिक भदाणे (वय ४५) यांनी धुळे तालुुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अजंग गावात हळदीचा कार्यक्रम होता. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुलींकडे पाहून शिट्या मारणे, जोरजोरात आरोळ्या मारणे असे प्रकार काही जणांकडून सुरू होतेे. हे पाहून आनंदा भदाणे यांनी या कृत्यास मज्जाव केला. हे पाहून एका महिलेसह तिघांनी त्यांना शिवीगाळ केली. दमदाटीही केली.
वाद विकोपाला जात असल्याने त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने डोक्यावर मारल्याने गंभीर दुखापत झाली. हे पाहून मध्यस्थी करणारा आनंदा भदाणे यांच्या भावालाही हातबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर जखमी अवस्थेत आनंदा भदाणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर आनंदा भदाणे यांनी धुळे तालुका पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, धुळे तालुका पोलीस ठाण्यात महिलेसह तिचा पती आणि मुलाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.