चार दिवसांसाठी धुळे शहर पुन्हा लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:50 PM2020-04-22T22:50:19+5:302020-04-22T22:50:51+5:30
कोव्हीड-१९ प्रतिबंधीत क्षेत्र : इतर रुग्णांसाठी दुसरे रुग्णालय, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाशी चर्चा
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी शहरात मनपा हद्दीत २३ एप्रिलच्या मध्यरात्री पासून २७ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे़ नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
शहरात सहा, तर शिंदखेडा व साक्री तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना विषाणूबाधित असे एकूण आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य रुग्णांवर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय या शासनाने घेतला आहे. जिल्ह्याला लागू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात व जिल्ह्यातील सेंधवा गावात कोरोना संसगार्ची लागण झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच शहरात सहा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी एक कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असल्याने जिल्हादंडाधिकारी यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार मनपा क्षेत्रासाठी कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही संचारबंदी लागू राहील.
अन्यथा गुन्हा दाखल
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) व भारतीय दंड संहिता (45 आॅफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य ती कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे.