Dhule: सिनेस्टाइल पाठलाग करून गो-तस्कराला पकडले, बॅरिकेट तोडून निसटण्याचा पिकअप व्हॅनचा प्रयत्न फसला
By देवेंद्र पाठक | Published: August 1, 2023 06:49 PM2023-08-01T18:49:22+5:302023-08-01T18:50:11+5:30
Mumbai: मध्य प्रदेशातून टेम्पोच्या माध्यमातून गोवंशाची वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅनचा गोरक्षक आणि पोलिसांनी पाठलाग सुरू केला. लळींग टोलनाक्याचे बूम आणि आर्वीतही पोलिसांनी लावलेले बॅरिकेटस् वाहनाने तोडले.
- देवेंद्र पाठक
धुळे - मध्य प्रदेशातून टेम्पोच्या माध्यमातून गोवंशाची वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅनचा गोरक्षक आणि पोलिसांनी पाठलाग सुरू केला. लळींग टोलनाक्याचे बूम आणि आर्वीतही पोलिसांनी लावलेले बॅरिकेटस् वाहनाने तोडले. झोडगे गावाजवळ एका वाहनाला धडक दिल्यानंतर पिकअप व्हॅन उलटली. गो-तस्कर पोलिसांच्या हाती गवसला. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.
मध्य प्रदेशातून एमपी ४३ डीएच ४६९६ या पिकअप वाहनातून गोवंशाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुक्यातील लळींग गावातील गोरक्षक मनोज राजपूत यांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. तत्पूर्वी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मनोज राजपूत यांच्यासह चेतन झिपरे, विकास गोमसाळे यांनी गुरांची वाहतूक करणारे वाहन लळींग टोलनाक्यावर अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वाहनाने टोलनाक्याचे बूम तोडून पळ काढला. ही माहिती आपत्कालीन सेवा ११२ या क्रमांकाद्वारे पोलिसांना कळविण्यात आली. तसेच आर्वी येथील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून पिकअप अडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र तोही अडथळा तोडून व्हॅनचालकाने पळ काढला. सर्व्हिस रस्त्याने वाहन पळवित चालकाने पोबारा केला. त्यामुळे तालुका पोलिसांसह गोरक्षकांनी तस्कराचा अंदाजे ३० किमीपर्यंत पाठलाग केला. यावेळी पिकअप चालकाने पळण्याच्या नादात देवदर्शनासाठी चाललेल्या एमएच १८ एजे ५४४३ या क्रमांकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघाताच्या घटनेनंतर पिकअप व्हॅन दुभाजकाला धडकून उलटले. त्यामुळे गोरक्षकांनी आणि पोलिसांनी चालकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण, अंधाराचा फायदा घेऊन चालक फरार होण्यात यशस्वी ठरला. तर त्याचा एक साथीदार बाबू कालिया (वय ४४, रा. मुलतानपुरा, जि. मंदसोर, मध्य प्रदेश) हा पोलिसांच्या ताब्यात आला. त्याची चौकशी सुरू आहे. यावेळी १० गुरांची सुटका करण्यात आली. काही गोरक्षक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.