धुळे विभागाला पंढरपूर यात्रेतून १ कोटीचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:35 AM2019-08-04T11:35:32+5:302019-08-04T11:36:57+5:30
गेल्यावर्षापेक्षा यावेळी २३ लाखांनी उत्पन्न वाढले
आॅनलाइन लोकमत
धुळे : आषाढी एकादशीनिमित्त धुळे विभागातर्फे पंढरपुरसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या माध्यमातून धुळे विभागाला तब्बल १ कोटी ९ लाख ८८ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षापेक्षा यावेळी २३ लाखांनी उत्पन्न वाढले आहे.
विठू नामाचा गजर करीत पालखी-पायी दिंडीत सहभागी होऊन अनेक भाविक ३०० ते ३५० किलोमीटरचा पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करीत असतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून विठूमाऊलीच्या चरणी नतमस्तक होत असतात.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातून हजारो भाविक ‘पांडुरंगा’च्या दर्शनासाठी जात असतात. भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आले होते. यावर्षी ७ ते १३ जुलै असे पाच दिवस धुळे, साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, शिंदखेडा, नवापूर, व दोंडाईचा या आठ आगारातून बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या.
धुळे विभागातर्फे २०० बसेसद्वारे ४५० फेºया करून त्याद्वारे विभागाला १ कोटी रूपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
दरम्यान या जादा बसच्या माध्यमातून तब्बल ६४ हजार भाविकांनी प्रवास केला. त्या माध्यमातून विभागाला १ कोटी ९ लाख ८८ हजाराचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली.
मात्र या जादा बसेस सोडत असतांना ग्रामीण भागातील काही मार्गावरील बसफेºया तूर्त रद्द करण्यात आल्या होत्या.