Dhule: धूम स्टाईल येत दोघांनी लांबविली ३ तोळ्यांची सोनपोत, जुने धुळे भागातील घटना, घटनेमुळे भीतीचे वातावरण
By देवेंद्र पाठक | Published: March 17, 2023 03:47 PM2023-03-17T15:47:10+5:302023-03-17T15:47:36+5:30
Crime News: शहरातील जुने धुळे परिसरातील झणझणी माता मंदिराजवळ एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची सोनपोत धूम स्टाईल आलेल्या दोघांपैकी एकाने लांबविली.
धुळे : शहरातील जुने धुळे परिसरातील झणझणी माता मंदिराजवळ एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची सोनपोत धूम स्टाईल आलेल्या दोघांपैकी एकाने लांबविली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. भरवस्तीत अशा प्रकारची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली.
दरम्यान, आझादनगर पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले. जुने धुळे भागातील गल्ली नंबर १ मध्ये झणझणी माता मंदिर आहे. या मंदिराला लागून इंदुबाई चंद्रकांत बुरकुले या वृद्ध महिलेचे वास्तव्य आहे. गुरुवारी सायंकाळी ७ ते साडेसात वाजेच्या सुमारास ही वृद्ध महिला दूध घेऊन घराकडे परतत होती. त्याच वेळेस अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलवरून दोनजण त्या महिलेजवळ धूम स्टाईलने आले. त्यापैकी मागे बसलेल्या चोरट्याने इंदुबाई यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची सोनपोत खेचून पोबारा केला.
सोनपोत लुटून चोरटे पाटाच्या दिशेने पसार झाले. अत्यंत गजबजलेल्या वस्तीत हा प्रकार घडल्याने चोरट्यांची हिम्मत वाढत असल्याचे अधोरेखित होत आहे. यामुळे परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिसात नोंद झालेली नव्हती.