धुळे जिल्ह्यातील १०६ जि.प.शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:21 PM2018-09-27T12:21:51+5:302018-09-27T12:23:20+5:30
विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत होवू शकते समायोजन
आॅनलाइन लोकमत
धुळे : २० व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील १०६ जिल्हा परिषद शाळांमध्ये २० व त्यापेक्षा कमी पटसंख्या आहे. त्यामुळे या शाळांवर भविष्यात गंडांतर येऊ शकते, अशी चर्चा सुरू झालेली आहे. मात्र याबाबत जिल्हा परिषदेला कुठलाही आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा आहेत. या सर्व शाळा डिजीटल आहेत. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजीटलच्या माध्यमातून शिक्षण मिळते आहे. मात्र आता ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी आता शहरात येतांना दिसतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकतर बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
शासनाचा हा प्रयत्न म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा व त्यांचे भविष्य अंधारात अंधाराच्या गर्तेत ढकलणारा असल्याची टीका होऊ लागली आहे.
दरम्यान शासनाच्या या प्रयत्नाच्या विरोधात महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे मंगळवारी राज्यभर काळ्याफिती लावून कामकाज करण्यात आले.
साक्री तालुक्यात
सर्वाधिक ६८ शाळा
२० व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये साक्री तालुका अव्वल आहे. या तालुक्यात तब्बल ६८ शाळांमध्ये २० व त्यापेक्षा कमी पटसंख्या आहे. त्याखालोखाल शिरपूर तालुक्यात १८, धुळे तालुक्यात १४ व शिंदखेडा तालुक्यातील सहा शाळांमध्ये कमी पटसंख्या आहे.
शिक्षक दोन विद्यार्थी
मात्र पाच, सातच
जिल्हा परिषदेच्या या शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. या शाळांमध्ये दोन शिक्षक असून, विद्यार्थी संख्या मात्र पाच, सात एवढीच आहे. धुळे तालुक्यातील एका शाळेत सात विद्यार्थी आहेत. त्यात पाच मुले व दोन मुलींचा समावेश आहे. साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत अवघे चार विद्यार्थी आहेत. त्यात दोन मुली, दोन मुलांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे समायोजन
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यास त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येऊ शकते असेही सांगण्यात आले.