‘शाळा सिद्धी’त धुळे जिल्हा १२व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:06 AM2019-02-13T11:06:18+5:302019-02-13T11:07:47+5:30
स्वयंमुल्यमापन : जिल्ह्यात १९९३पैकी १५२७ शाळांचे मुल्यमापनाचे काम पूर्ण, ९०.६२ टक्के झाले काम
आॅनलाइन लोकमत
धुळे :शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९९३ पैकी १५२७ शाळांचे स्वयंमुल्यमापनाचे काम पूर्ण झालेले आहे. तर २७९ शाळांचे मुल्यमापनाचे काम प्रगती पथावर आहे. जिल्ह्यात स्वयंमूल्यमापनाचे काम ९०.६३ टक्के झालेले आहे. शाळासिद्धी उपक्रमात धुळे जिल्हा १२व्या स्थानी आहे. स्वयंमुल्यमापनात सर्वात अग्रस्थानी सातारा जिल्हा तर सर्वात तळाशी नागपूर जिल्हा आहे.
महाराष्टÑ शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८-१९ यावर्षासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देशभरात शाळा सिद्धी तर महाराष्टÑात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात एकूण १९९३ शाळा आहे. त्यापैकी १५२७ शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम पूर्ण झालेले आहे. तर २७९ शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र जिल्ह्यातील १८७ शाळांनी अद्यापही स्वयंमूल्यमापनाच्या कामाला सुरुवातच केलेली नाही. स्वयंमूल्यमापनाच्या या कामाची टक्केवारी ९०.६२ एवढी असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानातून देण्यात आली.
राज्यात जिल्हा १२ व्या स्थानी
शाळासिद्धी स्वयंमूल्यमापनात राज्यात सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. या जिल्ह्यातील स्वयंमूल्यमापनाचे काम ९८.४७ टक्के झालेले आहे. तर शाळा सिद्धी अंतर्गत सर्वात कमी स्वयंमूल्यमापानाचे काम नागपूर जिल्ह्यात झाले असून, त्याची टक्केवारी ४२.६० एवढी आहे. धुळे जिल्ह्यात हेच काम ९०.६२ टक्के झाले असून, जिल्हा राज्यस्तरावर १२व्या स्थानी आहे. राज्यात आतापर्यंत शाळासिद्धी स्वयंमूल्यांकनाचे काम ८३.१३ टक्के झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.