धुळे जिल्ह्यात दहावीसाठी ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:40 PM2018-02-26T16:40:59+5:302018-02-26T16:40:59+5:30
चार उपद्रवी केंद्राचा समावेश, ६३ केंद्रावर होणार परीक्षा
आॅनलाईन लोकमत
धुळे : दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. इयत्ता दहावीसाठी जिल्ह्यात ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १ ते २४ मार्च २०१८ या कालावधित होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ६३ केंद्र
दहावीची एकूण ६३ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये १३, धुळे ग्रामीणमध्ये १७, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात ९, व शिंदखेडा तालुक्यात ११ केंद्राचा समावेश आहे. गेल्यावर्षी ६२ केंद्रे होती. यावर्षी साक्री तालुक्यात एका केंद्राची भर पडलेली आहे.
आठ ठिकाणी कस्टडी
प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था केली आहे. यामध्ये धुळे शहर व ग्रामीणसाठी ३ , साक्री व शिंदखेदा तालुक्यासाठी प्रत्येकी दोन व शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडींची व्यवस्था केली आहे.
चार संवेदनशील केंद्र
जिल्ह्यात चार संवेदनशील केंद्रे असून त्यात धुळे तालुका १, साक्री तालुका २, शिंदखेड्याच्या एक केंद्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे दहावीसाठी धुळे शहर व शिरपूर तालुक्यात एकही संवेदनशील केंद्र नाही.
संवेदनशील केंद्रावर नजर
दहावीच्या संवेदनशील केंद्रावर भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्या परीक्षा केंद्रांना परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.