धुळे जिल्ह्यात सातव्या जनगणणेसाठी १ हजार प्रगणक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:05 PM2019-08-11T12:05:05+5:302019-08-11T12:05:58+5:30
१ सप्टेंबरपासून सुरू होणार जनगणना
आॅनलाइन लोकमत
धुळे : केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे संपूर्ण देशात सातवी आर्थिक गणना होणार आहे. धुळे जिल्ह्यात एकसप्टेंबरपासून ही गणना सुरू होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.
सातव्या आर्थिक गणनेसाठी गठित जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी शशांक काळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. ए. तडवी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, अपर तहसीलदार सुदाम महाजन (दोंडाईचा), संजय शिंदे (धुळे शहर), किशोर कदम (धुळे ग्रामीण) यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या गणनेसाठी नियुक्त प्रगणकांमध्ये बहुतांश स्थानिक तरुणांचा समावेश असेल. त्यांना स्थानिक पातळीवर पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, पोलिस आवश्यक तेथे सहकार्य करतील. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदस्तरावर संबंधित वॉर्ड आॅफिसर सहकार्य करतील. तशा सूचना संबंधितांना देण्यात येतील. तसेच तालुकास्तरावर समन्वयक नियुक्त करावा. सर्व प्रगणकांचे प्रशिक्षण घेण्यातयावे, अशाही सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी दिल्या.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी काळे यांनी सांगितले, सातव्या आर्थिक गणनेचे काम एक सप्टेंबरपासून
सुरू होईल. त्यासाठी एक हजारावर प्रगणक, २५२ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.प्रथमच ही गणना माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आॅनलाइन मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे होईल. त्यामुळे माहिती संकलनाचे काम जलदगतीने होईल, असेही त्यांनी सांगितले.