धुळे जिल्हा कृषी विभागाने घेतले मातीचे २९ हजार नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:32 PM2018-06-16T12:32:17+5:302018-06-16T12:32:17+5:30
उद्दिष्टपूर्ती: नमुने प्रयोगशाळेत पाठविले, शेतकºयांना होणार फायदा
आॅनलाइन लोकमत
धुळे : खरिपाचा हंगाम सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्याला माती परीक्षणासाठी २९ हजार ५० नुमने घेण्याचे लक्षांक देण्यात आले होते. कृषी विभागाने नमुने संकलित करण्याची उद्दिष्टपूर्ती केली असून, माती नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे प्रभारी कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी सांगितले.
शेतकºयांना शेतजमिनीतील घटकद्रव्यांची माहिती व्हावी, त्यानुसार पिकांची निवड करून, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करता यावे यासाठी, माती परीक्षण करणे गरजेचे असते. कृषी विभागाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात येते. त्यासाठी दरवर्षी जिल्ह्याचे उद्दिष्टही ठरविण्यात येत असते.
माती परीक्षणासाठी कृषी विभागातर्फे नमुन्यांचे संकलन करण्यात येत असते. यासाठी शेतकºयांचा गट तयार करून, त्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेऊन ते एकत्रित करून, प्रमाणानुसार नमुने परीक्षणासाठी पाठविले जातात. माती परीक्षणासाठी बराच कालावधी लागत असतो.
यावर्षी धुळे जिल्ह्याला २९ हजार ५० माती नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात धुळे तालुक्यातील ८३ गावातील सहा हजार, साक्री तालुक्यातील ११० गावांमधील ८ हजार ६५०, शिंदखेडा तालुक्यातील ७७ गावांमधील ७ हजार ६०० व शिरपूर तालुक्यातील ६७ गावांमधील ६ हजार ८०० मृद नमुने संकलितचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण करण्यात आले.
हे मातीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल असे सांगण्यात आले.