धुळे जिल्ह्यात वैयक्तीक शौचालयांची १०० टक्के कामे होऊनही उदासिनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:37 PM2018-04-09T15:37:00+5:302018-04-09T15:37:00+5:30
स्वच्छ भारत मिशन : जि.प. प्रशासनाला स्वच्छतेसाठी जनजागृती करावी लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात मार्च अखेर वैयक्तीक शौचालयांची १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यानुसार जिल्हा हगणदरीमुक्त झाल्याचा दावा जि.प. प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. असे असतानाही शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात उदासिनता दिसत आहे. वैयक्तीक शौचालयांची कामे झालेली असतानाही अनेक जण आजही उघड्यावर शौचास जाताना दिसतात. त्यामुळे येणाºया काळात जि.प. प्रशासनाला स्वच्छ व सुंदर धुळे जिल्ह्यासाठी जनजागृतीवर विशेष भर द्यावा लागणार आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या २०१२ च्या बेसलाईन सर्वेच्या आधारे वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण झाले. परिणामी, जिल्हा हगणदरीमुक्त म्हणून घोषित झाला. परंतु, असे असताना आज अनेक जण उघड्यावरच शौचास जात असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी जि.प. प्रशासनाला जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे.
जि.प. प्रशासनाची प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याची तयारी
३१ मार्चपर्यंत वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्टपूर्ण झाल्यानंतर जि.प. प्रशासनाने नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती यावी; याउद्देशाने विशेष कार्यक्रम घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप नियोजन झालेले दिसत नाही. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयांची कामे सुरू झाली. तेव्हा जि.प. प्रशासनाने गूड मॉर्निंग पथकांची नियुक्ती केली होती.
या पथकांमार्फत उघड्यावर शौचास बसणाºयांना सुरुवातीला गांधीगिरी पद्धतीने पुष्पगुच्छ देऊन शौचालयांमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. तरीही परिस्थितीत बदल होत नसल्याने अनेकांना पोलीस स्टेशनला नेऊन यापुढे उघड्यावर शौचास बसणार नाही, असे लेखी लिहून घेण्यात आले होते. तर काहींना दंडात्मक कारवाईदेखील झाली होती. याच प्रकारची कार्यवाही पथकांमार्फत येणाºया काळात अपेक्षित आहे. तरच स्वच्छ व सुंदर धुळे जिल्हा होऊ शकणार आहे.
पंधरा दिवसात ४ हजार ६२ शौचालयांची कामे
जिल्हा परिषद प्रशासनाला २०१७-१८ या कालावधित १ लाख २५ हजार ३० वैयक्तीक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २०१२ च्या बेसलाईन सर्वेनुसार हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ९८ हजार ११२ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली होती. तर १५ मार्चपर्यंत साक्री व शिरपूर तालुक्यातल वैयक्तीक शौचालयांची १०० टक्के कामे ही पूर्ण झाली. तर अखेरच्या पंधरा दिवसात धुळे तालुक्यात ४ हजार ४ व शिंदखेडा तालुक्यात ६२२ असे एकूण ४ हजार ६२ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आल्याची माहिती जि.प. प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.