धुळे जिल्हयात दोन दिवसात चार हजार नवमतदारांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:43 AM2019-03-06T11:43:11+5:302019-03-06T11:43:54+5:30
मतदार नोंदणी विशेष मोहीम, अनेकठिकाणी चांगला प्रतिसाद
आॅनलाइन लोकमत
धुळे :आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यात दोन दिवस मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. यात दोन दिवसात ४ हजार ४७ मतदारांनी नाव नोंदणी केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रात २ व ३ रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१९ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ३१ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडून लोकसभा मतदार संघासाठी मतदार यादी जाहिर करण्यात आली. त्यानंतर फेबु्वारीमध्ये ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यासाठी दोन दिवस मोहिम राबविण्यात आली होती. मात्र या मोहिमेनंतरही काही जणांचे नावनोंदणी करण्याचे राहून गेले होते.त्यांच्यासाठी आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाभरात २ व ३ मार्च रोजी मतदार केंद्रावर बीएलओ मार्फत नवमतदार नावनोंदणी मोहिम राबविली. त्यात पहिल्या दिवशी १ हजार २०० जणांनी तर तर दुसºया दिवशी जवळपास २ हजार ८०० मतदारांकडून नावनोंदणी करण्यात आली. एकूणच या मोहिमेला नवतरूण मतदारांसह इतराकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात ४ हजार ४७ मतदारांकडून नावनोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६ भरून दिले आहे. त्यात २ हजार ३२१ पुरूष तर २ हजार ६ महिला मतदाराचा समावेश आहे. त्यांचे नावे आता संगणकात अपलोड करून पुरवणी यादीत संबंधिताच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहेत. दरम्यान,शहरातील काही मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित नसल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यासंदर्भात संबंधितांविरूध्द कारवाई करण्याचेही संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. अजूनही नावनोंदणीची प्रक्रिया ही निवडणुकीच्या घोषणेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे अजूनही कोणी नावनोंदणीपासून वंचित राहिला असेल त्यांनी संबंधित बीएलओशी संपर्क साधून अथवा तहसिलदार कार्यालयात नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.