कलावंताना मानधन मिळावे यासाठी धुळे जि.प. सीईओंच्या दालनासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:32 PM2019-01-17T17:32:43+5:302019-01-17T17:34:45+5:30
विविध मागण्या, ६० कलावंताना पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यातील ६० कलावंताची मानधनासाठी निवड झाली असून, त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. हे थकीत मानधन मिळावे, कलावंताच्या मानधनात वाढ करावी, प्रतिवर्षी कलावंताचे ३०० प्रस्ताव मंजूर झाले पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शाहीर कलावंत, साहित्तीक, कवि, लेखक, तमाशा कलावंत, वारकरी संप्रदाय (भजनी मंडळ), एकतारी लोककलावंत, गोंधळी, वाघ्या मुरळी, जोगती, यासह विविध क्षेत्रातील कलावंताचे विविध प्रश्न प्रलंबित आहे.
निवड होऊन मानधन नाही
जिल्ह्यातील ६० कलावंताची सप्टेंबर १८ पासून मानधनासाठी निवड करण्यात आलेली आहे. मात्र त्यांना पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. ते मानधन त्वरित मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तालुका व जिल्हा स्तरावर कलावंताना शासनाच्या विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळत नाही. त्याबाबत या कार्यालयाशी संपर्क साधला असता, जिल्हा परिषदेचे कर्मचारी अरेरावीने उत्तरे देतात, अपमान करतात. तसेच तालुकास्तरावर वृद्ध कलावंताना शासनाच्या मानधन प्रस्तावाबाबत पोच अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कलावंतावर अन्याय होत आहे.
ठिय्या आंदोलनाप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, फुला गवळे, वसंत कुवर, निंबा चौधरी, भाईदास गवळे, रवींद्र पाटील, ताराचंद गवळे, त्र्यंबक जगदाळे, काशिनाथ गवळे, नथ्थु साळुंके, खंडू वानखेडे, आसाराम अहिरे, शंकर मोरे, अशोक निकुंभ, पंडीत बोढरे, निंबा बेडसे, दिगंबर वाघ, हिंमत पवार, भालेराव पाटील, पांडुरंग वाघ, राजेंद्र वाघ, रजेसिंग गिरासे, वेडुसिंग गिरासे, दीपक महाजन आदी उपस्थित होते.