धुळे जिल्हा सरकारी वकीलपदी अॅड़ देवेंद्रसिंह तवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:36 PM2018-05-14T22:36:51+5:302018-05-14T22:36:51+5:30
नियुक्ती : राज्य शासनाकडून आदेश प्राप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा सरकारी वकिलपदी अॅड़ देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांची सोमवारी राज्य शासनाने नियुक्ती केली. शासनाने तरूण वकिलाला या पदाची संधी दिलेली आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना प्राप्त झाली आहे.
अॅड़ देवेंद्रसिंह तवर यांचे धुळे शहरातील भावे स्कूल तथा आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिरात प्राथमिक, न्यू सिटी हायस्कूलमध्ये माध्यमिक, जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय आणि अॅड़ झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण झालेले आहे. पुढे त्यांनी पुणे येथील नामांकित आय. एल. एस. लॉ कॉलेजमधून १९९८ मध्ये वकिलीची पदवी घेतली व धुळे जिल्हा न्यायालयात त्याच वर्षापासून वडिलांच्या सहकार्याने कामकाज सुरू केले. अॅड़ तवर यांना वयाच्या ४२ व्या वर्षी जिल्हा सरकारी वकिल पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळालेली आहे.
अॅड़ तवर यांचे वडिल (कै.) योगेंद्रसिंह प्रेमसिंह तवर हे कायदा क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तीमत्व होते. फौजदारी स्वरूपाच्या कामकाजातून त्यांनी संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळविला होता.
अॅड़ देवेंद्रसिंह तवर यांचे आजोबा (कै.) प्रेमसिंह तवर हे देखील जिल्हा सरकारी वकिल होते. एका दाव्याच्या कामकाजासाठी डॉ. आंबेडकर यांना धुळ्यामध्ये आणण्यात अॅड़ प्रेमसिंह तवर यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या आग्रहामुळे डॉ. आंबेडकर हे लळिंग कुरणातील लांडोर बंगल्यात मुक्कामी होते. असा गौरवशाली वारसा अॅड़ देवेंद्रसिंह तवर यांच्या पाठीशी असून तो नेटाने ते पुढे नेत आहेत.