धुळे जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:46 AM2019-11-04T11:46:17+5:302019-11-04T11:46:35+5:30
१ नोव्हेंबरपर्यंत फक्त १९२१ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त, गती वाढविण्याची गरज
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाईसाठी पीक विमा अर्ज भरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. परंतु पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. १ नोव्हेंबरपर्यंत ७६ हजार ८०२ पैकी १ हजार ९२१ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कृषी उपसंचालक एस.डी. मालपुरे यांनी जिल्हाधिकाºयांना दिली आहे.
जिल्ह्यात यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे ४ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. त्यात कपाशीची २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान शासनाच्या निर्देशानंतर कृषी व महसूल विभागाने पंचनामे सुरू केलेले आहेत.
जिल्ह्यात २०१९-२० अंतर्गत ७६ हजार ८०२ शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे.
मात्र स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनी किंवा संंबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, महसूल विभाग, व बॅँकेस विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकºयांना करण्यात आले होते. अर्ज प्राप्त झाल्यानंतरच विमा कंपनी पंचनामे करून नुकसान भरपाई देत असते.
१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील फक्त १ हजार ९२१ शेतकºयांचे अर्ज विमा कंपनीकडे प्राप्त झाले होते. अपेक्षेनुसार किमान आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त होणे गरजेचे होते.
पीक विम्यासाठी अर्ज भरून घेण्याचे प्रमाण अतिशय धीम्यागतीने सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनीही यावेळी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान अर्ज भरण्याच्या कामाला गती देण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना केली.