धुळे जिल्ह्यात अजुनही आरटीईचे २३४ प्रवेश अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:21 AM2019-09-19T11:21:02+5:302019-09-19T11:21:24+5:30
आतापर्यंत १२३७ पैकी फक्त १००३ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
आॅनलाइन लोकमत
धुळे : शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ९७ इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये १ हजार २३७ विद्यार्थ्यांना आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहे. मात्र शाळा सुरू होऊन चार महिने झाले तरी अद्यापही पूर्ण प्रवेश झालेले नाहीत. आतापर्यंत केवळ १ हजार २३७ पैकी १००३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतलेला आहे. अजूनही २३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होणे बाकीच आहेत. सहामाही परीक्षेपूर्वी हे प्रवेश पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
यावर्षी इयत्ता पहिलीकरीता आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया ५ मार्च २०१९ पासून सुरू झालेली आहे. १६ जून १९ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शाळा सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. काही शाळांमध्ये पहिली घटक चाचणीही झालेली आहे. आता आगामी महिन्यात सहामाही परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे. तरीदेखील आरटीई अंतर्गतचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश केव्हा पूर्ण होतील, ते शाळेत कधी दाखल होतील, अभ्यास कधी करतील आणि परीक्षा केव्हा देतील असे असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत.