जलस्त्रोत तपासणीत धुळे जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:54 AM2019-01-11T11:54:28+5:302019-01-11T11:56:07+5:30
धुळ्यासह पालघर, बुलढाणा, उस्मानाबाद,जालना, हिंगोली व नाशिक जिल्ह्यातही १०० टक्के काम
आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्ह्यात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर १८ या कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक घटकांची तपासणी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले होते. यात जिल्हयातील २८५० जलस्त्रोतांचे काम पूर्ण करण्यात आले. राज्यात धुळ्यासह पालघर, बुलढाणा, उस्मानाबाद, जालना, हिंगोली तसेच नाशिक या सात जिल्ह्यांनी १०० टक्के कामगिरी बजावल्याची माहिती मिळाली आहे.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या शासननिर्णयानुसार दरवर्षी सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी वर्षातून दोनदा करण्यात येत असते. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची संख्या २ हजार ८५० असून, या सर्व स्त्रोतांचे जिओ फेन्सिंग मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे मॅपिंग गरण्यात आले.
हे मॅपिंग एडीसीसी कंपनी नागपूर यांनी २०१६-१७ मध्ये केले होते. त्यानुसार स्त्रोत निश्चिती झाल्यानंतर दरवर्षी पावसाळ्यानंतर १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर व पावसाळ्याआधी १ मार्च ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील जलस्त्रोतांची वर्षातून दोनवेळा रासायनिक जिओ टॅगिंग करून पाणी नमुने संकलित करण्यात आले.
यावर्षी १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिखारी मधुकर वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, यांच्या सुचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जलसुरक्षक, आरोग्य सेवक यांनी या अभियानात सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व जलस्त्रोतांची मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झालो. राज्यात धुळ्यासह पालघर, बुलढाणा, उस्मानाबाद, जालना, हिंगोली व नाशिक या सात जिल्ह्यांनी १०० टक्के कामगिरी बजावली आहे.