धुळे विभागाला दोन दिवस पुरेल एवढा डिझेलसाठा उपलब्ध
By अतुल जोशी | Published: January 2, 2024 04:32 PM2024-01-02T16:32:59+5:302024-01-02T16:33:32+5:30
टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे.
धुळे : टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यातच ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीवरही या डिझेल टंचाईचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या धुळे विभागाकडे दोन दिवस पुरेल एवढा साठा आहे. संप लांबल्यास त्याचा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होण्याची शक्यता धुळे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी व्यक्त केलेली आहे.
धुळे-नंदुरबार जिल्हा मिळून असलेल्या धुळे विभागात एकूण नऊ आगार आहेत. या सर्व आगारांमध्ये जवळपास ३५० पेक्षा अधिक बसेस आहे. धुळे विभागाला दररोज ५० ते ५५ हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते. सध्या या विभागाकडे दोन दिवस पुरेल एवढा डिझेलसाठा आहे. मात्र संप जास्त दिवस सुरू राहिल्यास एसटीचेही चक्काजाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी धुळे विभाग नियंत्रक कार्यालयामार्फत पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन बंदोबस्तात डिझेलचा टँकर मागविण्याची मागणी करण्यात आलेली आहे.