धुळे विभागात गेल्या वर्षाच्या तुलनेत एस.टी.अपघातांच्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:01 PM2018-01-17T12:01:44+5:302018-01-17T12:03:12+5:30

मयतांची संख्या झाली कमी मात्र जखमींचे प्रमाण वाढले, महामंडळातर्फे अर्थसहाय्य

In Dhule division, the number of ST collisions decreased compared to last year | धुळे विभागात गेल्या वर्षाच्या तुलनेत एस.टी.अपघातांच्या प्रमाणात घट

धुळे विभागात गेल्या वर्षाच्या तुलनेत एस.टी.अपघातांच्या प्रमाणात घट

Next
ठळक मुद्देधुळे विभागात २०१६ मध्ये १३९ अपघातात ३५ जण मयत२०१७ मध्ये १३५ अपघातात २५ जण झाले मयतसहा प्रवाशांना प्रत्येकी १० लाखांप्रमाणे ६० लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  चालकांसाठी प्रशिक्षण, गाड्यांची वेळोवेळी करण्यात येणारी दुरूस्ती, आगारांमध्ये नवीन गाड्यांचा समावेश यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात अपघातामध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहेत. २०१६ मध्ये १३९ अपघात झाले होते. त्यात ३५ जण मयत झाले होते. तर २०१७ मध्ये १३५ अपघात झाले होते. त्यात २५ जण मयत झाले होते. अपघातांची संख्या चारने  तर मयतांच्या संख्या १०ने कमी झालेली आहे. मात्र  २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये जखमींची संख्या वाढलेली आहे.  
दुचाकी, चारचाकी,खाजगी प्रवाशी गाड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. असे असले तरी अनेकजण एस.टी.महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात.  वाहनांच्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्याला एस. टी.ही अपवाद राहिलेली नाही. मात्र इतर खाजगी प्रवाशी वाहनांच्या तुलनेत एस.टी.च्या अपघातांची संख्या कमी आहे. 
धुळे विभागात धुळ्यासह साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, अक्कलकुवा, शिंदखेडा, नवापूर, दोडाईचा असे एकूण नऊ आगार असून, या नऊ आगारात बसेसची एकूण संख्या ८४४ एवढी आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१६ मध्ये   धुळे विभागातील बसचे एकूण १३९  अपघात झाले होते. यात  २२ प्राणांतिक अपघात असून १०३ अपघात गंभीर आहेत.  तर १४ किरकोळ अपघात होते. या अपघातांमध्ये ३५ जण मयत झाले होते. त्यात   राज्य परिवहन बसमधील १३ प्रवाशी व  अन्य २२ जणांचा समावेश होता. तसेच एकूण २५७ प्रवाशी जखमी झाले होते. त्यात २२२ राज्य परिवहन बसमधील प्रवाशी व  ३५ पादचारी व अन्य जणांचा समावेश होता. 
जानेवारी ते डिसेंबर २०१७ मध्ये अपघातांच्या संख्येत घट झालेली आहे. या वर्षात एकूण १३५ अपघात झाले. त्यात प्राणांतिक  १५, गंभीर १०४, व किरकोळ १६ अपघातांचा समावेश होता.
या अपघातांमध्ये २५ जण मयत झाले होते. त्यात १ राज्य परिवहन प्रवाशी व २४ अन्यांचा समावेश होता. तर ३८० प्रवाशी जखमी झाले होते. त्यात ३०६ राज्यपरिवहन प्रवाशांचा तर ७४ जखमींमध्ये पादचारी व अन्यांचा समावेश होता.
अपघात सहायता निधी योजना
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसमधून प्रवास करताना अपघात झाल्यास मृत प्रवाशांना विम्याची रक्कम म्हणून दहा लाख रुपये देणारी ‘अपघात सहायता योजना’ १ एप्रिल २०१६ पासून  सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रवासी तिकीटावर एक रुपया अधिभार लावण्यात येतो.
या अधिभारातून २०१६ मध्ये ४ कोटी २५ लाख ९१ हजार २१९ रूपये जमा झाले होते. त्यापैकी  २ कोटी ६ लाख, ५७ हजार, ४३० रूपयांची अपघातग्रस्तांना मदत करण्यात आली. याच योजनेंतर्गत २०१७ मध्ये ५ कोटी ७९ लाख ३० हजार ३७२ रूपये जमा झाले होते. त्यापैकी २ कोटी, ७२ लाख ३८ हजार ४६४ रूपयांची मदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
६० लाखांची मदत
परिवहन मंत्र्यांनी अपघात सहायता योजना सुरू केली आहे. एक रूपयात १० लाखाचा विमा असेही वर्णन या योजनेचे करण्यात येते. धुळे विभागातर्फे सहा प्रवाशांच्या मयतांच्या वारसांना प्रत्येकी १०-१० लाख याप्रमाणे ६० लाखांची मदत करण्यात आली. महाराष्टÑात फक्त धुळे विभागातर्फेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.


 

Web Title: In Dhule division, the number of ST collisions decreased compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.