धुळे विभागाला २०० नवीन बसेस मिळणार; व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती
By अतुल जोशी | Published: October 13, 2022 04:03 PM2022-10-13T16:03:32+5:302022-10-13T16:03:58+5:30
कोरोनामुळे बससेवा ठप्प असल्याने, महामंडळाला फटका बसला होता. मात्र आता ९० टक्के परिस्थितीत सुधारणा झालेली असून, पूर्वीप्रमाणेच सर्व मार्गावर बसेस धावू लागलेल्या आहेत.
धुळे : कोरोनाच्या कालावधीनंतर राज्य परिवहन महामंडळाची स्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नवीन बसेस खरेदी करण्यात येत असून, आगामी एक-दीड महिन्या धुळे-नंदुरबार जिल्ह्याला १०० नवीन बसेस मिळतील. त्यानंतर सहा महिन्यांत १०० इलेक्ट्रिक अशा एकूण २०० नवीन बसेस दिल्या जातील, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. शेखर चन्ने यांनी गुरुवारी महामंडळाच्या धुळे विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
शेखर चेन्ने म्हणाले, कोरोनामुळे बससेवा ठप्प असल्याने, महामंडळाला फटका बसला होता. मात्र आता ९० टक्के परिस्थितीत सुधारणा झालेली असून, पूर्वीप्रमाणेच सर्व मार्गावर बसेस धावू लागलेल्या आहेत. महामंडळाच्या अनेक बसेसची झालेली दुरवस्था बघता नवीन बसेस घेण्यात येत आहेत. काही कालावधीत इलेक्ट्रिक बसेसही महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील. धुळे विभागाला (धुळे-नंदुरबार जिल्हा) येत्या एक-दीन महिन्यांत १०० नवीन बसेस तर आगामी सहा महिन्यांत १०० इलेक्ट्रिक बसेस मिळतील. लांब पल्यासह ग्रामीण भागातील सर्व शेड्यूल्ड वेळेवर कसे सुरू राहतील याकडे लक्ष देण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासन वेळोवेळी मदत करीत आहे. असे असतानाही पगार मिळत नसल्याने, काही कर्मचारी संप करण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली