धुळे : मालवाहतूक कंपनीची २७ लाखांत फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:59 PM2023-03-30T15:59:29+5:302023-03-30T15:59:44+5:30
साडेतीन महिन्यानंतर शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल
सुनील साळुंखे
शिरपूर (जि.धुळे) - ग्राहकांना मालाची पोहच करून आलेले २७ लाख ६५ हजार ७६० रूपये कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता सदर रक्कम परस्पर लाटणाऱ्या कंपनीतील दोघा कर्मचाऱ्यांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जून ते ॲाक्टोबर २०२२ ची असून, तब्बल साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनटेक्स ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनी आकुर्डी, पुणे येथील मयुर भिमराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या दरम्यान कंपनीच्या कर्मचाऱ्याने एकाला हाताशी धरून कंपनीच्या शिरपूर येथील गोडावूनमधील माल ग्राहकाला पोहच केला. मात्र ग्राहकाकडून आलेले पैसे कंपनीच्या खात्यात जमा न करता त्या रक्कमेचा परस्पर अपहार केला.
हा अपहार २७ लाख ६५ हजार ७६० रुपयांचा आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरूध्द भादंवि कलम ४२०, ४०६, १२० ब, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोसई. संदीप मुरकुटे करीत आहेत.