धुळे-कळवण बसला मेशीजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:08 PM2020-01-28T23:08:52+5:302020-01-28T23:09:21+5:30
जखमींमध्ये खान्देशातील ११ जण : जीवितहानी टळली
धुळे : मेशी फाट्यानजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत धुळे- कळवण बस आणि रिक्षा कोसळल्याची दुर्देवी घटना घडली़ या बसमध्ये धुळ्याच्या महिलेसह सोनगीरचे तीन, पाचोरा येथील ४ आणि चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील ३ असे एकूण ११ जणांचा समावेश आहे़ ही बस धुळेमार्गे कळवणच्या दिशेने दुपारीच रवाना झाली होती़
एमएच ०६ - ८४२८ क्रमांकाची बस मेशी फाट्यानजिक रस्त्याच्या बाजुला असलेल्या खोल विहिरीत कोसळली़ या बसमधून सुमारे ४० प्रवाशी प्रवास करीत होते़ अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या धुळे विभागाने तात्काळ संपर्क साधून धुळ्याचे किती प्रवाशी आहेत़, याची खातरजमा करण्यास सुरुवात केली़
तर, दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमी येऊ शकतात असे गृहीत धरुन आवश्यक ती उपाययोजना देखील करण्यात आली होती़
जखमींमध्ये यांचा समावेश
धुळ्याकडून कळवणच्या दिशेने निघालेल्या बसला मेशीजवळ अपघात झाला़ यात धुळ्याचे ४ आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि चाळीसगाव मिळून ७ अशा ११ जणांचा समावेश आहे़ यात वत्सलाबाई बाबुलाल दशपुते (रा़ धुळे), गजराबाई जंगलु मोरे, कमल अंकुश मोरे, देवेंद्र नितीन मोरे (तिघे रा़ सोनगीर ता़ धुळे) (सध्या कळवण येथे कामाला आहेत़)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील अनिता अमोल पाटील (२५), अमोल पांडूरंग पाटील (३१), आदित्य अमोल पाटील (साडेतीन वर्ष), आयुष अमोल पाटील (०५)़
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील सुनंदा दीपक बोरसे (२७), देविका दीपक बोरसे (अडीचवर्ष), दीपक दगडू बोरसे (साडेतीन वर्ष)