धुळे आगारातून पुण्यासाठी १८ तर नाशिकसाठी ५० जादा बसेस सोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 09:21 PM2019-11-03T21:21:32+5:302019-11-03T21:21:51+5:30
दिवसभरात १८ ते २० हजार नागरिकांनी केला प्रवास
आॅनलाइन लोकमत
धुळे : सोमवारपासून सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये नियमित सुरू होणार असल्याने, रविवारी पुणे, नाशिक, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची धुळे मध्यवर्ती बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. धुळे आगारातून पुण्यासाठी रात्री ८ ते १० यावेळेत तब्बल १८ जादा तर नाशिकसाठी दिवसभरात ५० गाड्या सोडण्यात आल्या होत्या. दिवसभरात १८ ते २० हजार नागरिकांनी प्रवास केल्याची माहिती धुळे आगार व्यवस्थापक भगवान जगनोर यांनी दिली.
यावर्षी दिवाळीत पाऊस असला तरी नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेले विद्यार्थी, नागरिक दिवाळीच्या सणासाठी गावी आले होते. भाऊबीज सण आटोपल्यानंतर मंगळवारीच अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला होता. असे असले तरी बहुतांशजण रविवारपर्यंत गावी थांबून होते.
सोमवारपासून सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये पूर्ववत सुरू होणार आहेत. कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे असल्याने, अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला. त्यामुळे रविवारी धुळे बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली होती. स्थानकात पाय ठेवायलाही जागा नव्हती. प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे आगारातर्फे जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
रविवारी दिवसभरात नाशिकसाठी तब्बल ५० बसेस सोडण्यात आल्या. तर पुण्याला जाणाºया प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, रात्री ८ ते १० यावेळेत नियमित गाड्यां व्यतिरिक्त तब्बल १८ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या सर्व गाड्यांना प्रचंड गर्दी झालेली होती.
दरम्यान रविवारी दिवभरात तब्बल १८ ते २० हजार प्रवाशांनी धुळ्यातून प्रवास केल्याची माहिती आगार प्रमुख जगनोर यांनी दिली.
इतर आगारांच्या गाड्यांही गर्दी
दरम्यान चोपडा, अमळनेर, शिंदखेडा, शिरपूर, दोंडाईचा या आगाराच्या नाशिक, पुण्याला जाणाºया धुळे मार्गेच जात होत्या. या सर्व गाड्यांना प्रचंड गर्दी झालेली होती.