धुळ्यातला धुरळा! अमरिश पटेल यांच्या दिल्लीच्या वाटेत आडवे आले होते 'ते' दोघे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 05:44 PM2024-04-20T17:44:14+5:302024-04-20T17:45:41+5:30
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे अनिल गोटे यांनी त्या निवडणुकीत रणशिंग फुंकले होते. त्यांनी तब्बल ५४ हजार मते मिळवत अमरिशभाईंसाठी दिल्ली दूर केली.
शाम सोनवणे, लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे
अमरिशभाई पटेल यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात दोनदा उमेदवारी केली; पण त्यांना दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदा म्हणजे २००९ मधील लोकसभा निवडणुकीत मालेगावचे जनता दल (सेक्युलर) पक्षाचे उमेदवार निहाल अहमद आणि लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे त्यांच्या विजयात मोठा अडसर ठरले. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेचा बळी ठरल्याने त्यांचा दारूण पराभव झाला.
अमरिशभाई पटेल यांनी लढविलेल्या दोन लोकसभा निवडणुकांपैकी २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वार्थाने सक्षम असलेल्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप सोनवणे यांच्या तुलनेत ते डोईजड असल्याचे मतदारसंघात बोलले जात होते. प्रत्यक्ष निकाल लागला तेव्हा मात्र पटेल यांना फक्त २० हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या निवडणुकीबाबत अनिल गोटे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले, की ते निवडून येणार नाहीत, हे त्यांना माहीत होते; पण धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे त्यांनी त्या निवडणुकीत रणशिंग फुंकले होते. गोटेंनी तब्बल ५४ हजार मते मिळवत, पटेल यांच्यासाठी दिल्ली दूर केली.
भाजपाचे विजयी उमेदवार प्रताप सोनवणे यांना २ लाख ६३ हजार २६० मते मिळाली, तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार अमिरशभाई पटेल यांना २ लाख ४३ हजार ८४१ इतकी मते मिळाली होती. पटेल यांचा १९ हजार ४१९ मतांनी पराभव झाला होता. निहाल अहमद यांना ७२ हजार ७३८ आणि अनिल गोटे यांना ५३ हजार ६३७ मते मिळाली होती. अहमद आणि गोटे यांनी मिळून १ लाख २६ हजार ३७३ मते प्राप्त केली होती. तोच फरक महत्त्वाचा ठरला.
>> २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे पुन्हा रिंगणात उतरलेल्या अमरिशभाई पटेल यांना ३ लाख ९८ हजार ७२८ मते, तर भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना ५ लाख २९ हजार ४५० मते मिळाली होती. त्यावेळी पटेल यांचा १ लाख ३० हजार ७२२ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला होता.