धुळे महानगरपालिकेने केली एका महिन्यात तब्बल पाच हजार तक्रारींची सोडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:17 PM2017-12-07T12:17:30+5:302017-12-07T12:18:32+5:30
‘स्वच्छता अॅप’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेत वारंवार चकरा मारून, निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याच्या तक्रारींची संख्या शहरात कमी नाही़ मात्र असे असतांनाच मनपा प्रशासनाने ‘स्वच्छता अॅप’च्या माध्यमातून एकाच महिन्यात तब्बल ५ हजार तक्रारींची सोडवणूक केली आहे़ मनपा यंत्रणेच्या या कार्यतत्परतेमुळे वरिष्ठ अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत़
महापालिकेला स्वच्छ महाराष्ट्र २०१८ अंतर्गत केंद्र सरकारच्या स्वच्छता अॅपची जनजागृती करावयाची असून त्या अॅपच्या माध्यमातून प्राप्त होणाºया तक्रारींची २४ तासांत सोडवणूक करावयाची आहे़
अॅपच्या माध्यमातून होणाºया तक्रारींच्या सोडवणूकीनुसार मनपाला देशातील अन्य शहरांच्या तुलनेत रॅकींग मिळत आहे़ दरम्यान, मनपाने ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत तब्बल ५ हजार ५२० तक्रारींची सोडवणूक २४ तासांच्या आत केली आहे़
सदर तक्रारी स्वच्छतेसंदर्भातील आहेत़ शिवाय या अॅपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारी सोडविण्यात आल्यानंतर तक्रारकर्त्यांना मनपाच्या कामाबाबत प्रतिक्रिया देता येत आहे़
त्यानुसार अॅपच्या माध्यमातून १ हजार ८७ नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यापैकी १ हजार ४८ नागरिकांनी मनपाच्या कामावर समाधान व्यक्त केले असून २९ नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे़ तर १० नागरिकांनी तटस्थ भुमिका घेतली आहे़
आतापर्यंत ४ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे़ तर ३१ डिसेंबरपर्यंत ७ हजार नागरिक अॅप डाऊनलोड करतील असे लक्ष्य मनपाने ठेवले असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़
एकाच महिन्यात अॅपच्या वापरकर्त्यांसह तक्रारींच्या संख्येत भली मोठी वाढ झाली असल्याने व मनपाने तितक्याच तत्परतेने या तक्रारी सोडविल्याने मनपाचा देशात ७० वा क्रमांक सध्या आहे़