गळती रोखण्यात धुळे महापालिका अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:46 PM2019-02-14T22:46:23+5:302019-02-14T22:49:09+5:30
लाख मोलाचे पाणी मातीमोल : प्रभावी उपाययोजना करुन गळती रोखण्याचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लाखमोलाचे पाणी अक्षरश: मातीमोल होत आहे़ टंचाईचा काळ सुरु होण्यापुर्वीच त्या रोखण्याची नितांत आवश्यकता आहे़ मात्र, या गळत्या रोखण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र शहरातील ठिकठिकाणी प्रभावीपणे उमटत असल्याचे सर्वश्रृत आहे़ कुठेही उपाययोजना होताना दिसत नाही़
धुळेकरांना तापी पाणी पुरवठा योजनेसह नकाणे आणि डेडरगाव तलावातून पाणी वितरीत केले जाते़ आजच्या स्थितीत बहुसंख्य भागात ३ ते ४ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ त्याचे नियोजन पुरेशा प्रमाणात होत नसताना पाण्याची पाईप लाईन अथवा व्हॉल्व गळतीतून पाणी वाया जात असताना ते रोखू शकत नसल्याचे दुर्दैव आहे़ महापालिकेच्या दरवर्षाच्या अर्थसंकल्पात गळतीच्या कामांसाठी लाखों रुपयांची तरतूद केलेली असते़ असे असूनही दुरुस्तीचे काम कायमस्वरुपी का होत नाही? असा प्रश्नच आहे़
आजवर झालेल्या महासभा, स्थायी समितीच्या बैठकांमधून वेळोवेळी हा प्रश्न सदस्यांनी अगदी आक्रमकपणे मांडला आहे़ मात्र, तेवढ्यापुरता त्यावर लक्ष दिले जाते़ ठोस उपाययोजना केली जात नाही़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे़
दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाईप लाईन गळतीच्या कामांसाठी लाखो रुपयांची तरतूद केलेली असते़ त्यासाठी निधी देखील मिळतो़ असे असूनही गळती कायमची रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही़
फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे १५ दिवस शिल्लक आहेत़ आत्तापासूनच शहरातील काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे़ पाणी गळती ज्या ठिकाणी आहे ती आजच तयार झाली असे नसून खूप दिवसांपासून या गळत्या कायम आहे़ पांझरा नदीतून पाण्याचा पाईप गेला़ त्या ठिकाणी गळती असल्याने पाणी थेट पांझरेत वाहत आहे़