माझी वसुंधरा अभियानात धुळे महापालिका पहिल्या दहामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:44+5:302021-05-28T04:26:44+5:30
माझी वसुंधरा अभियानांतर्गत धुळे महापालिका राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पहिल्या दहा क्रमांकात आल्याबद्दल येथील सभागृहात औपचारिक कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ...
माझी वसुंधरा अभियानांतर्गत धुळे महापालिका राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पहिल्या दहा क्रमांकात आल्याबद्दल येथील सभागृहात औपचारिक कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आयुक्त अजिज शेख बोलत हाेते. व्यासपीठावर महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती संजय जाधव, विरोधी पक्षनेते शाबीर शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना थोरात, सभागृह नेते राजेश पवार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शिल्पा नाईक, शांताराम गोसावी यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
आयुक्त शेख म्हणाले, शासनाच्या पातळीवरून महापालिकेसाठी अनेकविध उपक्रम, योजना राबविण्याचे धोरण आखले जाते. त्या प्रत्येक उपक्रमांत, अभियानात धुळे महापालिकेचे सहभाग असतो. ऑक्टाेबर २०२० पासून माझी वसुंधरा अभियानात महापालिकेने सहभाग नोंदविला आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाच्यावतीने अभियान राबविण्यात आले. त्यात दिलेल्या निकषांचा उपयोग करून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सायकल चालवून पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न झाला. कुमारनगर भागात रस्त्यावर विशेष स्वच्छता माेहीम राबवून परिसर हगणदारीमुक्त करण्यात आला. यापुढील काळात महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सायकल चालवून पर्यावरण संवर्धनाचा आपण सर्व मिळून प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
महापौर सोनार म्हणाले, राज्यातील महापालिकांमध्ये धुळ्याची महापालिका पहिल्या दहामध्ये आली आहे, याचा मनस्वी आनंद आहे. पण, यापुढील काळात आपण सर्व मिळून प्रयत्न करू आणि धुळ्याच्या महापालिकेला पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू. अधिकारी आणि पदाधिकारी आम्ही एकजुटीने, एकदिलाने काम करीत आहोत, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. आम्ही मान-सन्मानासाठी वाद घालत नाही. आमच्यात समन्वय असल्यामुळे अधिकाधिक व दर्जेदार अशी कामे हाेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक सहायक आयुक्त विनायक कोते यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार नगरसचिव मनोज वाघ यांनी मानले. बहुसंख्य उपस्थित होते.