धुळे महापालिकेतर्फे सात दिवसांत १ कोटींची करवसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:32 AM2018-02-15T11:32:19+5:302018-02-15T11:33:07+5:30
शास्तीमाफी योजनेत ७ लाख रूपये शास्ती वसुल, कर भरण्यासाठी रांगा
धुळे : महापालिकेने यंदा सलग तिसºया वर्षी मालमत्ताधारकांना शास्तीमाफी देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे़ त्यानुसार शास्तीमाफी जाहीर झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत तब्बल १ कोटी रूपयांची करवसुली झाली असून त्यात ७ लाखांच्या शास्तीचा समावेश आहे़
महापालिकेने शास्तीमाफी अभय योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना ५ ते २३ फेब्रुवारी शास्तीत ५० टक्के तर २६ फेब्रुवारी ते ९ मार्च २५ टक्के सवलत जाहीर केली आहे़ शास्तीमाफी योजनेमुळे मनपात कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांच्या रांगा लागत आहे़
पहिला आठवडा लाभदायी
शास्तीमाफी योजना लागू झाल्यापासून अर्थात ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मनपाने एकूण १ कोटी ५ लाख ९५ हजार १०८ रूपयांची करवसुली केली आहे़ त्यात २३ लाख ५० हजार १०५ रूपये मागील थकबाकी वसुल झाली असून ३८ लाख ७७ हजार ९४५ रूपये चालू कर वसुल झाला आहे़ रोखीचा भरणा एकूण ६२ लाख २८ हजार ५० रूपये असून धनादेशाव्दारे ४३ लाख ६७ हजार ५८ रूपये कराचा भरणा झाला आहे़ सर्व मिळून एकूण १ कोटी ५ लाख ९५ हजार १०८ रूपयांचा मालमत्ता कर वसुल झाला आहे़ त्यामुळे शास्तीमाफीनंतर पहिलाच आठवडा मनपाला लाभदायी ठरला आहे़
मालमत्ता लिलावासाठी घेणार स्थायीची मान्यता
महापालिकेने मागील व चालू वर्षी सील केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र तत्पूर्वी मालमत्ताधारकांना नियमानुसार नोटीस देऊन मालमत्ता सील केल्यापासून २१ दिवसांची मुदत कर भरण्यासाठी दिली जाणार आहे़ तोपर्यंत मनपाकडून मालमत्तांचे मुल्यांकन करून त्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता घेतली जाणार आहे़ ज्या मालमत्तांना जाहीर लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद मिळणार नाही, त्या नाममात्र शुल्क आकारून मनपाच्या नावाने केल्या जातील़
करवसुलीसाठी ३९ पथके
आयुक्तांच्या आदेशानुसार कर वसुली करण्यासाठी तब्बल ३९ पथके नेमण्यात आली आहेत़ मात्र त्यापैकी बहूतांश पथकाचे सदस्य मनपातच बसून असल्याचे दिसून येते़ त्यामुळे बरीच पथके कागदावरच कार्यरत आहेत़ त्यामुळे धडक कारवाईसाठी पथके नेमून देखील कोणतीही मोठी कारवाई आतापर्यंत झालेली नाही़