धुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:47 PM2018-02-20T15:47:59+5:302018-02-20T15:49:10+5:30
१४ कोटी ६३ लाखांचा होता प्रकल्प, सुधारीत आराखड्यानंतर निघणार निविदा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेने शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी काढलेली १४ कोटी ६३ लाख रूपयांची निविदा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़ सुधारीत डिझाईन तयार करून नव्याने निविदा काढली जाईल, असेही ते म्हणाले़
महापालिकेने जानेवारी महिन्यात एकूण १४ कोटी ६३ लाख रूपयांची निविदा काढली आहे़ त्यात बायोमायनिंगसाठी ५ कोटी १२ लाख ६६ हजार ६७०, लॅन्डफिल करण्यासाठी ५ कोटी ४१ लाख ७३ हजार ८४१ व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ४ कोटी ९ लाख ५० हजार इतका खर्च येणार आहे़ मात्र शहरात कचरा संकलनाबाबतही तक्रारी असल्याने कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया एकाच संस्थेकडून व्हावी, त्यासाठी प्रति टन कचरा संकलनावर होणारा खर्च लक्षात घेऊन व अन्य ज्या महापालिका, नगरपालिकांनी कचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्या आहेत, त्यांच्याकडून माहिती मागवून घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़ त्यामुळे १४ कोटी ६३ लाख रूपयांची निविदा मनपाकडून लवकरच रद्द केली जाणार आहे़