धुळे मनपा निवडणुकीत ३९ हजार मतदारांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:27 AM2018-02-14T11:27:38+5:302018-02-14T11:29:44+5:30
१० गावांमधून वाढणार मतदार संख्या, राजकीय समीकरणे बदलणार
निखिल कुलकर्णी।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहर हद्दवाढीमुळे धुळे महापालिकेच्या निवडणुकीत ३९ हजार मतदारांची भर पडणार आहे़ नगाव वगळता हद्दवाढीतील १० गावांमधून हे मतदार वाढणार असून त्यामुळे ५ नगरसेवक वाढतील़
शहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारीपासून लागू झाली. त्यामुळे ११ गावांचा धुळे महापालिका क्षेत्रात समावेश झाला आहे़ पूर्वी शहराचे क्षेत्रफळ ४६़४६ चौ.कि.मी. इतके होते. त्यात हद्दवाढीमुळे ५४़६२ चौ.कि.मी. क्षेत्राची वाढ झाली आहे़ त्यामुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ १०१़०८ चौ.कि.मी. झाले आहे़ त्यामुळे शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे़ शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांमधील एकूण ३९ हजार ९० मतदार महापालिका निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत़ नगाव वगळता उर्वरित १० गावांमधील मतदारांना प्रथमच महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार आहे़ त्यात सर्वाधिक मतदार संख्या १७ हजार ३२७ वलवाड, तर सर्वात कमी ८४५ मतदार अवधान गावातून वाढणार आहेत़ मतदानाचा हक्क १८ वर्षे वयाची अट पूर्ण केल्यानंतर मिळत असल्याने त्याखालील लोकसंख्या लक्षात घेतल्यास संबंधित गावांची प्रत्यक्ष लोकसंख्या मतदार संख्येपेक्षा अधिक असली तरी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संख्येवरच सर्वाधिक राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत़ वाढीव मतदार संख्येचा फायदा केवळ मनपा निवडणुकीत होईल़
शहराची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार
२०११ च्या जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार ५५९ इतकी आहे़ त्यात १ लाख ९३ हजार ४४६ पुरुष व १ लाख ८२ हजार ११३ स्त्रियांचा समावेश आहे़
शहर हद्दवाढीतील गावांमधील मतदार धुळे मनपा निवडणुकीत मतदान करू शकणार असले तरी ते धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मतदान करू शकणार नाही़ त्यांचा विधानसभा मतदारसंघच धुळे ग्रामीण असेल़
नगाव गावातील गावठाण भाग मनपा क्षेत्रात सहभागी झाला असल्याने या गावाचे नागरिक मनपा निवडणुकीत मतदान करू शकणार नाही़
वाढीव क्षेत्रात सुविधा देण्याचे आव्हान
शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या १० गावांमधील मतदार मनपा निवडणुकीत मतदान करणार असल्याने येत्या काळात संबंधित गावांमध्येदेखील सोयी-सुविधा पुरविण्याचे आव्हान विद्यमान नगरसेवक व इच्छुकांना करावे लागणार आहे़ हद्दवाढीमुळे नगरसेवकांची संख्या ५ ने वाढण्याची शक्यता असली तरी त्याबाबतची स्पष्टता प्रभाग रचनेनंतरच होणार आहे़