धुळे मनपा कर्मचारी पुकारणार कामबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:37 PM2018-02-26T21:37:02+5:302018-02-26T21:37:02+5:30
मंगळवारी बैठक : प्रलंबित मागण्यांबाबत चर्चेनंतर होणार निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महानगरपालिका कर्मचाºयांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात मंगळवारी सकाळी ९़३० वाजता मनपा आवारात समन्वय समितीची बैठक होणार आहे़
केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाºयांना एकिकडे सातव्या वेतन आयोगाचे वेध लागलेले असतांना दुसरीकडे पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी महापालिका कर्मचारी समन्वय समितीचा पाठपुरावा सुरू आहे़ मनपातील कायम कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाचा तर फंडातील कर्मचाºयांना पाचव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येत आहे़ मात्र मनपातील काही ठराविक कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचाºयांना अजूनही वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही़ महापालिका प्रशासनाने आधी वर्ग ४ मधील सेवानिवृत्त त्यानंतर कार्यरत, वर्ग ३ मधील सेवानिवृत्त व त्यानंतर कार्यरत कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता़ त्याबाबतचे लेखी आश्वासन मनपा कर्मचारी समन्वय समितीला देण्यात आले होते़ परंतु त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही़ शिवाय वेतन आयोगाचा लाभ देतांना कोणतेही निकष न ठरवता केवळ वशिलेबाजीने कर्मचाºयांनी लाभ मिळविला असल्याचा आरोप काही कर्मचाºयांनी केला होता़