धुळे महापालिका लोकसेवा अध्यादेश लागू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:57 PM2018-03-30T16:57:56+5:302018-03-30T16:57:56+5:30
तीन वर्षानंतर हालचाली सुरू, अपिलीय अधिकारी नियुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नागरिकांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने शासनाने २३ जून २०१५ ला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश जाहीर केला आहे़ या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली मनपाने तीन वर्षांनंतर सुरू केल्या आहेत़ या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून खातेप्रमुख व व्दितीय अपिलीय अधिकारी म्हणून उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे़
महापालिकेत नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा मिळविण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची ओरड नेहमीच होत असते़ त्यामुळे नागरिकांना आवश्यक त्या सुविधा विहीत मुदतीत मिळाव्यात, यासाठी शासनाने २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेशाचा शासन निर्णय जाहीर केला आहे़ या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनपाचे तत्कालिन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी खासगी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही़ दरम्यान, आता मनपाने संबंधित अध्यादेश लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़ सदर अधिसूचनेनुसार निश्चित करण्यात आलेल्या १५ प्रकारच्या सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रथम अपिलीय अधिकारी व व्दितीय अपिलीय अधिकारी यांच्याकडे दाद मागता येईल व विलंबास जबाबदार कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ या अध्यादेशानुसार सेवा पुरविण्यासाठी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून खातेप्रमुख व व्दितीय अपिलीय अधिकारी म्हणून उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे़