धुळे महापालिकेच्या स्थायीच्या सभेत तीन मिनिटांत चार कोटींच्या कामांना मंजूरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 04:12 PM2017-11-16T16:12:42+5:302017-11-16T16:14:08+5:30
केवळ विषय वाचनाची ‘फॉरमॅलिटी’, एकाही सदस्याने कोणत्याच विषयावर मत मांडले नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी सकाळी ११ वाजता आयोजित केली होती़ ११ वाजून १ मिनिटांनी सुरू झालेली सभा अवघ्या तीन मिनिटात अर्थात ११़४ वाजता संपल्याचा अजब प्रकार मनपात घडला़ विशेष म्हणजे केवळ विषय वाचनाची ‘फॉरमॅलिटी’ पार पाडून तीन मिनिटात चार कोटींच्या कामांना मंजूरी देण्यात आली़
प्रथमच अचूक वेळेवर सुरू झालेल्या या सभेला सभापती कैलास चौधरी, उपायुक्त रविंद्र जाधव, प्ऱनगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते़ सभेच्या विषयपत्रिकेवर ६ विषय घेण्यात आले होते़ सभापतींसह नऊ सदस्यांच्या उपस्थितीत सभेला सुरूवात झाल्यानंतर प्ऱनगरसचिव मनोज वाघ यांनी विषयाचे वाचन सुरू केले़ विषय वाचन होताच सभापती कैलास चौधरी मंजूर म्हणून विषय मंजूर करीत होते़ अशाप्रकारे सर्व विषयांचे वाचन झाले व सर्व विषय अवघ्या तीन मिनिटांत मंजूर झाले़ एकाही सदस्याने सभेत कोणत्याच विषयावर मत मांडले नाही़ इतक्या कमी वेळेत सभा संपल्याने सदस्यांसह अनेकांची फसगत झाली़
या विषयांना मिळाली मंजूरी
स्थायी समितीच्या विषयपत्रिकेत असलेल्या विषयांमध्ये मागील तीन सभांचे इतिवृत्त कायम करणे, आयुक्तांच्या मान्यतेने आरोग्य विभागाने निर्गमित केलेले कार्यादेश अवलोकनार्थ सादर करण्यासह प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी कन्सल्टंट नेमण्याचा महत्त्वपूर्ण विषय होता़ त्यासाठी मागविण्यात आलेल्या दरनिविदा मंजूर करण्यास चर्चेविना मंजूरी मिळाली़ त्याचप्रमाणे देवपूर जलकुंभाजवळील व्हॉल्वच्या कामास कार्याेत्तर मंजूरी देण्यात आली़
चार कोटींचा विषय मंजूर
अमृत अभियानांतर्गत शहरातील २३ जागांवर उद्यान निर्मिती करण्याचा विषयही डोळे झाकून मंजूर झाला़ अमृत योजनेंतर्गत पहिल्या व दुसºया टप्प्यात ४ कोटी २ लाख रूपयांच्या निधीतून २३ जागांवर उद्याननिर्मिती करण्याचा विषय मंजूर करण्यात आला़ शहरातील २३ जागांवर उद्यानांची निर्मिती केली जाणार असून त्यासाठी दरमंजूरी करण्यात आली़ त्यामुळे लवकरच कार्यादेश दिले जाणार असून उद्यानाच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे़ स्थायी समिती सभापती आजारी असल्याने सभा लवकर आटोपण्यात आल्याचे काही सदस्यांनी सांगितले़